किरात‘ शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन

ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर यांची विशेष मुलाखत तर ‘आवाज चांदण्याचे‘ डॉ.प्रतिक गायकवाड यांची संगीत मैफल

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील ‘किरात‘ने जानेवारी २०२२मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून या शताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि.१४ मे रोजी शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळव्यात विविध कार्यक्रमांसोबत वेंगुर्ल्याचे सुपुत्र व ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर यांची विशेष मुलाखत आणि युवा पिढीतील उल्लेखनीय गायक आणि संगितकार डॉ.प्रतिक गायकवाड यांची ‘आवाज‘ चांदण्यांचे‘ ही संगीत मैफील रंगणार आहे.

येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात ४ ते ८ या वेळेत होणा-या या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रा.सुनिल नांदोस्कर, दै. तरुण भारतचे समुह प्रमुख सल्लागार तथा संपादक किरण ठाकूर, दै.तरुण भारत अक्षरयात्रा दिवाळी अंक संपादक बालमुकुंद पत्की आदी उपस्थित राहणार आहेत.

याचवेळी होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु.नीरजा माडकर व केतकी आपटे यांचा नृत्याविष्कार, राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत मसगे, कृष्णा मसगे आणि सहकारी यांचा कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, पखवाज वादक भाविका खानोलकर आणि हार्मोनियम वादक मयूर गवळी यांच्यासह बालदशावतार जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध वृत्त निवेदिका शिबानी जोशी या सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्याशी मुलालखतीद्वारे संवाद साधणार आहेत. डॉ.प्रतिक गायकवाड आणि सहकारी यांच्या ‘आवाज चांदण्यांचे‘ या भावस्पर्शी संगीत मैफिलीने स्नेहमेळावा कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या शताब्दी स्नेहमेळाव्याला वाचक, हितचितक आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ‘किरात‘ परिवारातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page