पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धात्मक उपक्रमांना नागरिक आणि जलतरणपटूचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिका आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या माध्यमातून मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित दांडी बीच रन, चिवला बीच रन, सागरी जलतरण या स्पर्धात्मक उपक्रमांना नागरिक व जलतरणपटू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दांडी समुद्र किनाऱ्यावर सागरी जलतरण उपक्रम आज सकाळी संपन्न झाला. त्याचा शुभारंभ मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.संतोष जिरगे यांच्या हस्ते करण्यात आला. या जलतरण मध्ये १०० मीटर जलतरण करिता २२ नागरिक आणि ५०० मीटर जलतरण करिता ५१ नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तर याच वेळी दांडी बीच रन हा उपक्रमही संपन्न झाला. त्याचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यामध्ये मुले, तरुण व प्रौढ नागरिकही सहभागी झाले होते. सहभागी सर्व ५४ जणांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, दांडी ग्रामस्थ, पर्यटक व्यावसायिक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. तसेच यानिमित्त चिवला बीच येथेही चिवला बीच रन उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व माजी नगरसेवक नितीन वाळके यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वाटप मुख्याधिकारी संतोष जिरगे, अश्विनी जिरगे, महेश कांदळगावकर, मंदाकिनी बाबी जोगी, सुधाकर पाटकर, सोनाली हळदणकर, निलेश घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page