कणकवली ता.११-:* कणकवली शहरातील महत्वाचा असलेल्या गोकुळधाम हॉटेल कडील नाल्याचे काम नगरपंचायत मार्फत प्रगतीपथावर असताना कणकवली शहरातील उबाळे मेडिकल कडील नाल्याचे काम गेले दोन दिवस युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
कणकवली शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर यात प्रामुख्याने काही जुन्या नाल्यांची बांधकामे ही चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने तशीच ठेवून कामे उरकली. मात्र या नाल्यांची शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी निचरा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका असल्याने ही नाल्यांची कामे मार्गी लावण्याची गरज होती. कणकवली शहरातील उबाळे मेडिकल कडील तेथील बिल्डिंग खालून गेलेल्या जुन्या नाल्याचे पाईप नव्याने टाकून मार्ग बदलण्यात येत आहे. या करिता ६ लाख ६९ हजार रुपयांचा निधी खर्च करून हे काम नव्याने करून घेण्यात येत आहे.
अगदी या बिल्डिंगच्या भिंती पर्यंतचा भाग खोदाई करून धोकादायक स्थितीत या नाल्याचे कॉंक्रीटचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आले. या नाल्याचे पाईप हे उबाळे मेडिकल कडील बिल्डिंगच्या खालून गेले असून, हे पाईप काढणे शक्य नसल्याने पाणी जाण्याचा पारंपारिक मार्ग बदलून हे काम मार्गी लावण्यात येत आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगर पंचायत कर्मचारी विभव करंदीकर, अभियंता सचिन नेरकर यांच्यासह नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. धोकादायक स्थितीत असले तरी सुरक्षेची काळजी घेत हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
