मालवण ता.१०-:* डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराच्या पाठीवर दांडा बसल्यावर ते सैरभर पळत सुटते तशीच अवस्था मंदार केणी यांची झाली आहे. केणी यांनी भ्रष्टाचारात कळस गाठून गोल्डमेडल मिळवले आहे. मात्र जनतेचे डोळे उघडे आहेत हे मंदार केणी यांनी लक्षात ठेवावे. येत्या निवडणुकीत जनता मंदार केणी यांच्या पाठीवर सोटा घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असून आज भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा केणी यांच्यावर टीका केली. यावेळी शहराध्यक्ष दीपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, मंदार केणी यांनी माझ्या नादी लागू नये. केणी यांनी इतिहासाच्या गोष्टी करू नये. केणी यांचा भूगोल आम्हाला माहीत आहे.
केणी ज्या पक्षात जातात तेथे प्रामाणिक न राहता आपले मनसुबे प्राप्त करण्यासाठी गद्दारी करतात. आपण वेल सेटल आहोत, माझ्या भविष्याची चिंता केणी यांनी करू नये. माझे अर्थकारण बिघडलेले नाही त्यामुळे निवांत झोप लागते. केणी हे ७.४५ नंतर कोमात आणि नॉट रीचेबल असतात, अशी टीका आचरेकर यांनी केली. मंदार केणी हेच बिल्डर लॉबी हप्तेखोर असल्याचे केणी यांनीच आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले. बिल्डरांकडून पैसे घेऊन ते सामाजिक कार्यासाठी वापरल्याचे केणी सांगत असले तरी या पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या पुनर्विकासासाठी केला आहे. त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले असून ते अपरिपक्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
तौक्ते वादळात आमदार वैभव नाईक ,खासदार विनायक राऊत यांनी वादळग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवलेले पत्रे, ताडपत्री, कौले यांचा एक कंटेनर मंदार केणी यांनी स्वतः गिळंकृत करत त्याचा वापर आपल्या हॉटेल साठी केला, असा आरोपही आचरेकर यांनी केला. राजकीय कट्टा या व्हॉट्सअप ग्रुपवर केणी यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांनी केणींच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचे स्क्रीन शॉट आपल्याकडे आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार केणी यांच्यामुळेच मिळाले नाही. गोरगरीब जनतेला लुटून केणी यांनी आपले उद्योग केले. केणी हे रक्तरंजित कॉलेजचे विद्यार्थी आणि नंतर प्राचार्यही बनले. आणि त्याच अनुभवाचा वापर करून ते शिवसेनेचेही कॉलेज करायला मागेपुढे पाहणार नाहीत. शिवसेना आमदार, खासदार यांना केणी अजून कळलेले नाहीत, असेही आचरेकर म्हणाले. नगरपालिका शतकोत्सवासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य केले. व्यापाऱ्यांकडून घेतलेली आर्थिक मदत ही व्यापाऱ्यांच्या समक्षच नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे त्या पैशाचा हिशेब नगराध्यक्ष व नगरपालिकेनेच दिला पाहिजे. मात्र केणी यांना तो हिशेब आम्ही द्यावा की नगरपालिकेने हे उमगत नाहीय. केणी हे कच्चे लिंबू आहेत. त्यांचे अंतर्गत मनसुबे धुळीस मिळविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा इशाराही आचरेकर यांनी दिला.
