इकोमेट्स ग्रुपतर्फे मुलांसाठी ‘दि क्वेस्ट’ निवासी कार्यशाळा संपन्न

मालवण ता.०८-:* मालवण मधील इकोमेट्स ग्रुपतर्फे मुलांसाठी भरवण्यात आलेली ‘दि क्वेस्ट’ (The Quest) ही दोन दिवसाची निवासी कार्यशाळा आचरा आणि तळाशिल येथे संपन्न झाली. ही निवासी कार्यशाळा भारतीय घटनेच्या मूलभूत कर्तव्यावर आधारित होती. यामध्ये मुलांना शालेय जीवनातच निसर्ग संवर्धन व निसर्गावर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा देऊ शकेल, असे उपक्रम रावबिण्यात आले.

या कार्यशाळेत शहरातील आणि गावातील मुलांचा सहभाग होता. कार्यशाळेचा पहिला दिवस मातीच्या घराच महत्व काय आहे हे समजण्यासाठी आचरा येथील “गावची मटी” येथे आयोजित करण्यात आला. तिथे मातीच्या भिंतीचा कौलारू घराचा अनुभव मुलांनी घेतला, मुलांना काही प्रश्न केले त्यातून त्यानीच उत्तरे शोधली. मातीच्या घराला लागणारी साधन सामग्री गावातुनच घेतली जायची हा शाळेत गिरवलेला पाठ मुलांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अनुभवला. तिथून बैलगाडीने प्रवास करत आचरा येथील प्रमोद वाडेकर यांच्या घरी मुलांना नेण्यात आले, तिथे बोटीतून प्रवास करताना अनोखी कांदळवन सफारी मुलांनी अनुभवली. कांदळवनाची माहिती वाडेकर यांनी मुलांना दिली. समुद्र आणि नदीचा संगम मुलांना दाखवण्यात आला. तिथून बैलगाडीचा प्रवास करून परत मटी मध्ये नेण्यात आले. रात्री तंबू मध्ये राहण्याचा अनुभव मुलांनी घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना पक्षी निरीक्षण करण्यासाठी नेण्यात आले. तिथे अनेक पक्ष्यांची ओळख मुलांना झाली.

पक्षी निरीक्षणचा आनंद मुलांनी लुटला. त्याठिकाणी कातळ, जांभा दगड, माळावरची फुले व पाणथळ जागा याविषयीची माहिती तसेच शेत कामासाठी बांधण्यात आलेल्या घराची म्हणजे मांगरची माहिती मुलांना देण्यात आली. त्यानंतर मटीमध्ये येऊन कोकणी न्याहारीचा आस्वाद मुलांनी घेतला तसेच अनेक खेळ खेळले . तळाशिल येथील सफरीत नारळाच्या झाडाचे फायदे मुलांनी जाणून घेतले. नारळाच्या झावळापासून बनवल्या जाणाऱ्या झापाचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. यानंतर मुलांना बोटीतून गड नदी फिरविण्यात आली. ‘सिंधुदुर्ग पर्यावरण समवेत’च्या माध्यमातून “बोटीवरची शाळा” हा नवीन आणि अतिशय माहितपूर्ण उपक्रम इकोमेट्स तर्फे दाखवला. समुद्र, नदी यांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. वाढत्या शहरीकरणात दुर्मिळ होत चाललेल्या आपल्या परंपरा कौशल्ये तसेच निसर्गाचे महत्त्व तसेच निसर्ग संवर्धनासाठी मुले काय काम करू शकतात यावर मार्गदर्शन गावची माहिती दिली गेली. या उपक्रमात इकोमेट्सचे ओंकार केणी, कविता तळेकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वाती पारकर, अमेय सुर्वे, मेगल डिसोझा आदी सदस्य सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page