*वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथील दुर्घटना
वेंगुर्ले ता.०६-:* तालुक्यातील वजराट परबवाडी येथील कार्तिकी शेखर परब वय 11 हिचा घरात झोपाळ्यावर झोका घेताना खाली पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वजराट येथील कार्तिकी परब ही सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोका घेत होती. झोका घेत असताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली. खाली पडल्यावर बेशुद्ध झाल्याने तिचे काका राजेंद्र परब यांनी तिला तात्काळ वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासल्यानंतर ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत राजेंद्र परब यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पालकर करीत आहेत.
