रामेश्वर प्लाझामध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
कणकवली ता.०५-:* कणकवलीत हायवे चौपदरीकरण कामात ठेकेदाराच्या चुकीमुळे गोकुळधाम हॉटेल नजीक तुंबणारे पाणी आणि त्यामुळे रामेश्वर प्लाझा इमारतीचा तळमजल्यावर साचणारे पाणी यावर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. गोकुळधाम हॉटेल नजीकच्या गटाराचे रुंदीकरण करून मोठे पाईप घालून गटारातील पाणी निचरा करण्याची उपाययोजना नगरपंचायतने केली आहे.
यासाठी 12 लाखांचा निधी मंजूर झाला असून आज सकाळपासूनच प्रत्यक्षात गटार पाईप रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यानगर मधून येणारे सांडपाणी रामेश्वर प्लाझा आणि हॉटेल गोकुळधाम दरम्यानच्या हायवेखालील गटारातून पुढे सुरळीत जाऊन मागील 4 वर्षे नागरिकांना होणारा त्रास वाचणार आहे. हायवे चौपदरीकरण कामात सदर गटारातून सांडपाण्याचा पुढे निचरा होत नव्हता.
याचा फटका रामेश्वर प्लाझामधील तळमजल्यातील सारस्वत बँकेसह अन्य व्यावसायिक आस्थापनांना होत होता. मागील 3 वर्षे रामेश्वर प्लाझाचा तळमजला पाण्याखाली बुडत होता. निवासी इमारतीतील रहिवाशांच्या पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी पाण्याखाली जाऊन लाखोंचे नुकसान होत होते. या समस्येवर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कायमस्वरूपी तोडगा काढत नगरपंचायत मधून सदर गटार रुंदीकरणसाठी लाखोंचा निधी मंजूर केला आहे. गटार रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून याबद्दल रामेश्वर प्लाझामधील आणि स्थानिक रहिवाशानी समाधान व्यक्त केले आहे.
