माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आ वैभव नाईक, महेश कांदळगांवकर यांच्यावर केली टीका
मालवण ता.०४-:* मालवण नगरपालिकेत गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरात विकास कामांचे तीन तेरा वाजवले. आमदार वैभव नाईक गेल्या आठ वर्षात आमदारकीच्या काळात स्व:खर्चातून महोत्सव सोडा साधा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ शकले नाहीत. मात्र आता नगरपरिषद प्रशासनाच्या खांद्यावर हात ठेवून पर्यटन महोत्सव आयोजित करत आहेत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पर्यटन महोत्सवातून जनतेच्या पैशाची लूट करण्याचा डाव शिवसेना लोकप्रतिनिधींनी मांडला आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि कुटुंबीय स्व:खर्चातून दणक्यात महोत्सव साजरे करायचे, तशी धमक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी धमक असेल तर स्व:खर्चातून महोत्सव आयोजित करावा असे आव्हान माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिले आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मालवण भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, ललित चव्हाण, बाळा मालवणकर, आदी उपस्थित होते. यावेळी आचरेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात मालवण शहरात सत्ताधारी शिवसेनेने बिल्डर्सना अभय देऊन उंच टॉवर देण्याची कामे केली. बिल्डर्स बरोबर चर्चा करण्यास शिवसेना लोकप्रतिनिधींनीना वेळ होता. मात्र विविध समस्यांनी होरपळणाऱ्या जनतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. गेल्या पाच वर्षात बाजारपेठेतील रस्ता करता आला नाही. व्यापाऱ्यांनी आक्रमक होऊन इशारा द्यावा. शिवसेनेचे राज्यकर्ते, नगराध्यक्ष आणि तेंच्या चेल्यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या पाच वर्षात बाजारपेठेतील रस्ता झाला नाही. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी फक्त पाच महिन्यात रस्ता करून दाखवला.
या कामाच्या शुभारंभाचा नारळ फोडताना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना लाज वाटत नाही का असा सवाल आचरेकर यांनी केला. डिसेंबर मध्ये नगरपरिषद नगरसेवकांचा कालावधी संपला आहे. पाच महिने प्रशासकीय राजवट सुरू आहे. आज मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन चांगले काम करत आहे. पाच वर्षात जे सत्ताधारी शिवसेनेला जमले नाही ते मुख्याधिकाऱ्यांनी चार महिन्यात करून दाखवले आहे.
मात्र त्यात हस्तक्षेप करून स्वतःची टिमकी वाजविण्याचे आणि रस्त्यांच्या कामाचे फुकाचे श्रेय शिवसेना राज्यकर्त्यांनी घेऊ नये, असेही आचरेकर म्हणाले. आम. वैभव नाईक एकही महोत्सव घेऊ शकले नाहीत. फक्त जनतेची फसवणूक केली. गेल्या पाच वर्षात शहरात सांगाडे आणि गटार उभारण्याचा उद्योग केला. विकासाच्या नावाखाली नगरपालिका लुटण्याचे काम केले. भुयारी गटार परिपूर्ण करणार अशी वलग्ना करणारे नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पालकमंत्री याना साधे २० टक्के काम करता आले नाही.
पाच वर्षात अग्निशमन बंब उपलब्ध करता आला नाही. गेल्या पाच वर्षात आगी लागण्याचे प्रकार घडले. नागरिकांनी स्वतः रात्री अपरात्री धावून येऊन शहर वाचवले. तरीही शिवसेना बंब आणू शकली नाही. परंतु मुख्याधिकारी जिर्गे यांनी अग्निशमन बंबसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. त्यामुळे बंब आल्यावर हेच राज्यकर्ते नारळ फोडण्यास पुढे असतील असा टोला आचरेकर यांनी लगावला. हिंमत असेल तर भुयारी गटार योजना पूर्ण करून दाखवा, मर्दुमकी असेल तर शहर विकास आराखडा रद्द करून दाखवा. आराखडा जैसे थे मंजूर करून शहर उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला आहे. जनतेची फसवणूक करून, संसार उध्वस्त करून शहराची राखरांगोळी करण्याचे काम शिवसेनेनं केले आहे अशी टीकाही आचरेकर यांनी केली.
