कॉन्स्टेबल संदीप राठोड यांना महासंचालक पदक महाराष्ट्र दिनी वितरण

वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांचा पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात आला. १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संदीप राठोड यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित नायर आदी उपस्थित होते. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी ही राठोड यांचे अभिनंदन केले.

संदीप सुरेश राठोड हे सन 2016 मध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलात नियुक्त झाले. सुरुवातीला त्यांनी ओरोस व सावंतवाडी या ठिकाणी पोलीस ठाण्यात काम केले. गेले तीन वर्ष ते वैभववाडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.

सन 2019 मध्ये करुळ घाटात संरक्षण कठड्यावर लोंबकळत असलेल्या कंटेनर मधील चालकाला संदीप राठोड यांनी सहीसलामत बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले होते. त्याचबरोबर 2020 मध्ये मैदाने भरलेला ट्रक करुळ घाटात दरीत कोसळला होता. ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला ही दरीतून बाहेर राठोड यांनी काढले. दोन चालकांचा जीव वाचविण्याचे काम कॉन्स्टेबल संदीप राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांने केले होते. दरम्यान त्याची दखल घेत तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री. गेडाम तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी देखील राठोड यांचा गौरव केला होता. त्याच बरोबर पोलीस उप महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील राठोड यांना गौरविले होते.

आज राठोड यांना पोलिस महासंचालक पदक देऊन सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. संदीप राठोड यांचे सिंधुदुर्ग पोलीस दलात तसेच वैभववाडी तालुक्यात सर्वांमधून अभिनंदन केले जात आहे. फोटो – ओरोस येथे पालकमंत्री उदय सामंत हे पो. कर्मचारी संदीप राठोड यांना पदक देऊन गौरविताना. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे. व इतर.

You cannot copy content of this page