Headlines

इन्सुलीत अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बांदा ता.०३-:* इन्सुली तपासणी नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारूची इनोव्हा कारमधून अवैध वाहतूक करताना केलेल्या कारवाईत ४ लाख ५१ हजार २०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५१ हजार २०० रुपयांंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कणकवली येथील चेतक भरत वाळवे (२५, रा. तिवरे) याला ताब्यात घेण्यात आले. कारमधून गोवा बनावटीच्या दारूचे ६१ बॉक्स जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून होणाऱ्या अवैध दारुची तस्करी रोखण्यासंदर्भात इन्सुली तपासणी नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बांद्याहून इन्सुलीच्या दिशेने येणारी इनोव्हा कार (एमएच ०७ क्यू ९०५४) तपासणीसाठी थांबविण्यात आली.

यावेळी ड्रायव्हर सीटच्या मागे ठेवलेल्या विविध ब्रॅण्डचे गोवा बनावटीचे एकूण ६१ दारुचे बॉक्स (किंमत ४ लाख ५१ हजार २००) व ७ लाखांची कार असा एकूण रुपये ११ लाख ५१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी चेतक भरत वाळवे याला ताब्यात घेण्यात आले. जिल्हा अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस. पी. मोहिते यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर. ए. इंगळे, दुय्यम निरीक्षक प्रवीण एस. रास्कर, सांगली निरीक्षक प्रशांत रासकर, दुय्यम निरीक्षक शंकर रणपिसे, जवान एस. जी. मुपडे, जवान संतोष वेदे, राकेश बनसोडे यांनी सहभाग घेतला. अधिक तपास निरीक्षक एस. पी. मोहिते करीत आहेत.

You cannot copy content of this page