वेंगुर्ला ता.०२-:* तुळस येथील शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात येत्या चार दिवसात संबंधित विभागाची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर तुळस येथील शेतक-यांनी येथील तहसिल कार्यालयासमोर रविवारी १ मे रोजी पुकारलेले उपोषण मागे घेतले.
दोन लाखावरील थकीत शेतक-यांची कर्जे माफ करण्यात यावीत, जोपर्यंत राज्यशासनाचा दोन लाखांवरील कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत बँकामार्फत चालू असलेली बँकाची वसुली थांबवावी, तसेच शेतक-यांच्या थकीत कर्जावरील व्याज आकारले जावू नये. खावटी कर्जाचा निर्णय त्वरीत मार्ग लावण्यात यावा, एचडीएफसी कंपनीकडे पाठपुरावा करुन सुद्धा २०२०-२०२१ मधील शेतक-यांची तफावत रक्कम अद्याप देण्यात आली नसून ती व्याजासह जमा करण्यात यावी, इको टोकीयो जनरल इशुरन्स विमा कंपनीनी भात धान्य विमा रक्कम २०२०-२०२१ मधील जमा केलेली नसून ती तात्काळ जमा करण्यात यावी आदी मागण्यां संदर्भात तुळस येथील शेतक-यानी १ मे रोजी येथील तहसिल कार्यालयासमोर उपोषण पुकारले होते.
या उपोषणात आंबा काजू विचार मंचचे सदस्य शामसुंदर राय, यशवंत भगत, मोहन भगत, नारायण गावडे, उत्तम नाईक, सुभाष सावंत, बाबा तेली आदी शेतकरी सहभागी झाले होते.
या उपोषणाच्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, तुळस सरपंच शंकर घारे, तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, माजी जि. प. सदस्य मकरंद परब, आंबा व काजू विचार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी भेट दिली. दुपारी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, तहसिलदार प्रविण लोकरे, नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे, कृषि सहाययक लाडू जाधव, नाईक यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण येत्या चार दिवसात यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक घेवून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर आंबा, काजू बागायतदार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेण्यात आले.
