पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेबाबत संशय

केसरी येथील दुबईत अडकलेल्या पाच युवकांबाबत संजू परब आक्रमक;आ केसरकर यांनी नोकरीचे आश्वासन न पाळल्याने युवकांना अन्यत्र जावे लागते

सावंतवाडी ता.०१-:* तालुक्यातील केसरी येथील ५ मुलांना दुबई येथे नोकरी लावतो म्हणून सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करत त्यांना दुबई येथे अडकवून ठेवणाऱ्या संशयित आरोपीला सावंतवाडी पोलिस प्रशासनाने अद्याप अटक केली नसून, “तो” आरोपी गावात मोकाट फिरत असून, पोलिस काहीच करत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी संशय व्यक्त केला आहे. आज ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबत परब अधिक माहिती देताना म्हणाले की, तालुक्यात केसरी या ठिकाणी असणाऱ्या धनगर वाडीत काहीजण बेरोजगार असल्याने ते रोजगार मिळविण्यासाठी धडपडत करत असतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याच भागातील एका इसमाने प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये घेऊन ५ जणांचे एकूण ६ लाख रुपये घेऊन दुबई येथे नोकरी देतो असे आमिष दाखवून त्या ५ ही युवकांना दुबई चे तिकीट काढून त्या ठिकाणी पाठवले आहे.

परंतु, त्या इसमाने केवळ त्यांना एक महिन्याचा विझा दिल्याने ते युवक तेथे अडकून पडले आहेत. याबाबत आपण स्वतः आणि केसरी येथील नागरिकांनी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दिली असताना देखील सावंतवाडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक तसेच कोणताही अधिकारी किंवा हवालदार त्या ठिकाणी जाऊन त्यांनी परिस्थिती समजून घेतली नाही. त्यांचा निषेध आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. यावेळी येत्या ४ दिवसात त्या आरोपीला ताब्यात घेतले नाही तर सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक आणि सावंतवाडी पोलिस स्टेशनचा निषेध करून, याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली जाईल असा इशारा संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी त्यांच्याकडून ही कोणतेही कृती झाली नाही तर मात्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यानी यावेळी दिला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांनी निवडणुकीच्या काळात रोजगार बावत दिलेली आश्वासने पाळली नसल्यानेच तेथील युवकांना गोवा, आणि इतर ठिकाणी नोकरीसाठी जावे लागत असून, अनेकवेळा त्यांची फसवणूक होत आहे.

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, व केसरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page