पालकमंत्री सामंत यांचे प्रशासनाला आदेश
सिंधुदुर्गनगरी ता.३०-:* खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांना बि-बियाणे खते तसेच कृषि पुरक औषधे याचा तुटवडा भासू नये यासाठी कृषि विभागाने आवश्यकत्या सर्व बाबींची साठवणूक करावी तसेच मागणी प्रमाणे पुरवठा होईल यासाठी सुक्ष्मपणे नियोजन करावे असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकरी, प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.एन. म्हेत्रे, आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम काळात शेतकऱ्यांना बियाणांची व खतांची आवश्यकता असते अश्यावेळी ती कमी पडू नयेत. यासाठी कृषि विभागाने खबरदारी घ्यावी, असे आदेश देवून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कृषि विभागाच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करावे. जिल्ह्यामध्ये ९, १० व ११ मे २०२२ या काळात कुडाळ येथे कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. याचे योग्य पध्दतीने नियोजन करावे. तसेच येत्या काळात सिंधु महोत्सवांचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हा ग्राम कृषि विकास आराखडा सन २०२२ चा आराखडा सादर करताना सांगितले, जिल्हा भौगोलिक क्षेत्र ५ लाख ३ हजार ९५० हेक्टर आहेत. यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र २ लाख ५ हजार १३५ हेक्टर. तर हंगामी पिकाखाली खरीपाचे क्षेत्र ५९ हजार ३९० हेक्टर आहेत.
तसेच ऊस लागवड २ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र आहे. असे एकूण ६२ हजार १८८ हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर फळ पिकाखाली १ लाख ४२ हजार २४७ हेक्टर क्षेत्र आहे. लागवडी लायक पड क्षेत्र ५९ हजार ५६३ हेक्टर आहे. तर जंगल क्षेत्र ५५ हजार ५६६ हेक्टर आहे. कवळकाड ४० हजार ५३४ हेक्टर आहे. खडकाळ व लागवडीस अयोग्य क्षेत्र १ लाख २१ हजार ८७८ हेक्टर आहे. अकृषक क्षेत्र २१ हजार २७४ हेक्टर आहे. जिल्ह्यामध्ये एकूण जमीन धारक अत्यल्प – २ लाख ४० हजार ७१९, अल्प- ४२ हजार १२६, इतर- १८ हजार ५४ असे एकूण ३ लाख ८९९ आहे. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली इतर तृणधान्ये, कडधान्य, तेलबिया, इत्यादी पिके घेतली जातात. ख्ररीप हंगाम २०२२-२३ चा १ लाख ९३ हजार ३१८ इतका उत्पादन लक्षांक आहे. सन २०२०२-२३ साठी खत पुरवठा मागणीमध्ये युरीया, डीएपी, एसएसपी, एमओपी व संयुक्त व मिश्र खतांची मंजूर आवटंन १२५०० क्विंटल आहे. जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री परवाने परवान्याची संख्या ८२१ आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये गुणवंत्ता नियत्रंणासाठी उपाययोजना म्हणून कृषि निविष्ठा उपलब्धता व गुणवंत्ता नियत्रणांसाठी एकूण ९ भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आले असून यामध्ये एक जिल्हास्तरावर व आठ तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले आहे. त्याचबरोबर कृषि विभागामार्फत जिल्ह्यात ३०१ ग्राम कृषि विकास समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विभागाच्या माध्यमातून क्रॉप सॅप/ हॉर्टसॅप अंतर्गत किड व रोगांचे नियोजन, पिक प्रात्यक्षिके नियोजन करण्यात येते. त्याचबरोबर पिक विमा योजना पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतात. असे कृषि विभागामार्फत सांगण्यात आले.
