यावर्षी तब्बल ३६ विद्यार्थी परजिल्ह्यातील : गेली ४ वर्षे भाजपचा लढा
वेंगुर्ले ता.३०-:* केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील मुले वंचित रहातात. गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे. या प्रकाराला शिक्षण विभागही जबाबदार आहे . कारण शिक्षण विभागातील परजिल्ह्यातील अधिकारी यांचे हितसंबंध असल्यामुळे तीकडील मुले फक्त परीक्षेसाठी आणुन , त्यांचा कागदोपत्री प्रवेश दाखवुन परीक्षेला बसवली जातात. ती मुले कोल्हापुरात असताना सुद्धा त्यांची याठिकाणी हजेरी दाखवली जाते , व शिक्षण विभाग त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते . त्यामुळे मुलांना परीक्षेसाठी हाॅलतीकीट मिळते.
वेंगुर्ले तालुक्यातील हीच परिस्थिती बदलण्यासाठी भाजपाने आवाज उठविला. तसेच परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बसू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानुसार आज ३० एप्रिल रोजी वेंगुर्ले शहरातील पाटकर हायस्कूल या केंद्रावर सकाळी नऊ वाजता भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, नितीन चव्हाण, तुषार साळगावकर, शेखर काणेकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, प्रणव वायंगणकर, साई भोई यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच पालक जमा झाले. या सर्वांनी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखीची माहिती देऊन जे विद्यार्थी परजिल्ह्यातील आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्वारा वरूनच मागे पाठवले. दरम्यान काही वेळाने पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, उपनिरीक्षक केसरकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. आणि ज्या मुलांकडे हॉल तिकीट आहे त्या मुलांना ते परजिल्ह्यातील असले तरी परीक्षा केंद्रावर जायला दिले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे भाजपने जोरदार आक्षेप घेतला यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा तणाव उशिरापर्यंत सुरू होता. आपल्या भागातील घाटमाथ्यावरील काही शिक्षक या परजिल्ह्यातील मुलांना परीक्षेसाठी घेऊन येत होते. हा खरा तर स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या विरोधात आम्ही शासनापर्यंत दात मानसून संबंधितांची तक्रार शिक्षण विभागाकडे करणार असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी सांगितले.
