Headlines

नवोदय प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करा

जिल्हा शिक्षक समितीची मागणी

*⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प.च्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. याबाबत प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत साशंकता निर्माण झाली आहे.

जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांना सांगेली येथील नवोदय विद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्हयात असूनही आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही सातत्याने केवळ चुकीच्या पद्धतीने कार्यपद्धती राबवली जात असल्याने काही प्रशालांमध्ये जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना इयत्ता ५ वी मध्ये नाममात्र प्रवेश दिला जातो सदर विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत उपस्थित नसल्याचे आढळते आणि त्या मुलांना निकष डावलून नवोदय निवड चाचणी परीक्षेला बसविले जाते . वस्तुतः सदर निवड चाचणीला बसणारे विद्यार्थी हे इयत्ता ३ री व इयत्ता ४ थी मध्ये सुद्धा याच जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असणं आवश्यक आहे . परंतु ती इयत्ता ५ वी मध्येच या जिल्ह्यामध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास येते. आणि अशा मुलांना सदर परीक्षेला बसू देणं हे निकषाला धरून नाही.

याबाबत योग्य ती दखल घेऊन ज्या प्रशालेमध्ये असे विद्यार्थी आढळतील त्या विद्यार्थ्यांना नवोदय निवड चाचणी परीक्षेला बसण्यास प्रतिबंध करावा जेणेकरून केवळ या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याची सुसंधी प्राप्त करून देऊन या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होणार अन्याय दूर करावा अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. अन्यतः या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संघटनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी.असे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम व जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांनी दिले आहे.

You cannot copy content of this page