मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी
मालवण ता.२७-:* परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा वायंगणी शाळेत प्रवेश दाखवून त्यांना नियमबाह्य पद्धतीने नवोदय परीक्षेसाठी हॉल तिकीट दिल्या गेल्याच्या प्रकाराची काल मालवण शिवसेना व युवासेनेने पोलखोल केल्यानंतर याबाबत युवासेनेचे आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी दिलेला शाळाप्रवेश नियमबाह्य असून या विध्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेस बसण्यास देऊ नये, अशी भूमिका युवासेनेने घेतली आहे.
युवासेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर १९ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट मुख्याध्यापक यांनी बुधवारी आपल्या ताब्यात घेत संस्था अध्यक्ष यांच्या ताब्यात दिली आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मुख्याध्यापक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी युवासेना व संस्था पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे. मालवण तालुका युवासेनेच्या माध्यमातून काल मंगळवारी वायंगणी शाळेत धडक देत नवोदय परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलेल्या शाळाप्रवेशाच्या कारभाराची पोलखोल केली होती. याप्रश्नी ग्रामस्थ व संस्था पदाधिकारीही आक्रमक बनले होते. ३० एप्रिलला होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेस नियमबाह्य प्रवेश असलेल्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देणार नाही.
मुख्याध्यापक यांनी त्या मुलांना दिलेली हॉल तिकीट त्यांच्याकडून मागवून घ्यावी, अशी मागणी युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर, सुजित जाधव, मंदार केणी यांनी केली होती. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना दिलेली हॉल तिकीट मागून घेतली आहेत. संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांच्याकडे दिली आहेत, अशी माहिती युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी यांनी दिली. याप्रकरणी मालवण तालुका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वायंगणी शाळा येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. मुलांची हॉल तिकीट मागून घेतली म्हणजे हे प्रकरण संपले असे नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यापूर्वीही असे प्रवेश देण्यात आले होते का ? याचीही चौकशी झाली पाहिजे. असे प्रवेश झाले असतील तर ते रद्द झाले पाहिजेत. संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या बरोबर शिक्षण विभागाचे कोणी अधिकारी यात सहभागी आहेत का ? याचीही उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य उदय दुखंडे यांनी केली आहे. तर याप्रश्नी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून कारवाईची मागणी करणार असल्याचे उदय दुखंडे यांनी सांगितले. नियमबाह्य पद्धतीने पराजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना नवोदय शाळा प्रवेश मिळण्यासाठी आमच्या शाळेत त्यांचे प्रवेश दाखवून शाळेची बदनामी करणाऱ्या मुख्याध्यापक यांची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. अशी भूमिका संस्था अध्यक्ष सदानंद राणे यांनी स्पष्ट केली आहे.
