*⚡मालवण ता.२७-:* गेले वर्षभर वारंवार अर्ज विनंत्या करूनही आडवली तिठा ते बांदिवडे रस्ता डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग चालढकलपणा करत असल्याने संतप्त आडवली ग्रामस्थांनी सरपंच संदिप आडवलकर यांच्या नेतृत्वाखाली रविवार १ मे रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
आडवली तिठा ते बांदिवडे मसुरे ओझर रस्ता या ग्रामपंचायत आडवली मालडी हद्दीतील रस्त्याची आर ए यादव हायस्कूल या सुमारे दिड ते दोन कि मी रस्त्याची पुर्णतः दुरावस्था झाली आहे. गावातून जाणारा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. याबरोबरच गाड्यांचेही अतोनात नुकसान होत असल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्रामपंचायत आडवली मालडी तर्फे गेले वर्षभर अर्ज विनंत्या करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकलपणा केला जात असल्याने आडवली सरपंच संदिप आडवलकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देवून तातडीने दखल घेऊन रस्ता डांबरीकरण अगर खड्डे भरणा करून न दिल्यास दि १ मे रोज रास्ता रोखो करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत अरविंद साटम, माजी उपसरपंच विनोद साटम, विष्णू घाडीगांवकर, ग्रा प सदस्य सुनील जाधव आदी उपस्थित होते.
