मालवणात वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबीर व वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

मालवण ता.२४-:* वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या वारकरी कीर्तन परंपरेची ओळख करून घेण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या ‘वार्षिक रिंगण’ आणि ‘बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबीर आणि वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ पै सेवांगण चिवला बीच, धुरिवाडा, मालवण इथे हे शिबीर होणार असून कीर्तन महोत्सव मालवण शहरातील भरड येथील श्री दत्त मंदिर इथे होणार आहे, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. देवदत्त परुळेकर यांनी माहिती दिली. यावेळी कोषाध्यक्ष रुजरिओ पिंटो, नितीन वाळके आदी उपस्थित होते यावेळी ऍड. परुळेकर म्हणाले, बॅ. नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. वारकऱ्यांचं श्रद्धामय आणि भक्तिमय जीवन हा बॅ. नाथ पै यांच्या प्रकृतीचा स्थायीभाव होता. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेण्याचा भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कीर्तनकारांनी पाळावयाच्या मर्यादा, निरुपण करताना अभंगाच्या कडव्यांतील आतरसुसंगती, कीर्तनात गायच्या संगीत चालींचं महत्त्व अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीची यातून ओळख होईल. वारकरी संतपरंपरेचा महान वारसा, वारकरी तत्त्वज्ञान आणि संप्रदायाचं स्वरूप, आजच्या काळात कीर्तनाची गरज वारकरी संप्रदायातील देवाची संकल्पना, वारकरी संप्रदायातलं नामस्मरणाचं महत्त्व वारकरी संप्रदायातल्या प्रार्थनेचं स्वरूप, वारकरी कीर्तनाची पद्धत आणि तंत्र वारकरी संगीत आणि अभंगांच्या चाली, भजन, काकडा, हरिपाठ आणि दिंडी, वारकरी प्रवचन विषय मांडणी आदींची चर्चा या शिबिरात चर्चा होणार असून कीर्तन प्रवचन नव्यानं शिकण्याची इच्छा असणारे तरुण, संत साहित्याची आवड आणि कुतूहल असणाऱ्यांनाही हे शिबीर उपयुक्त ठरू शकेल.

चार दिवसीय शिबिरात सचिन परब, ऍड. देवदत्त परुळेकर, हभप ज्ञानेश्वरमहाराज घेरडीकर, हभप दत्तात्रय महाराज दोन्हे, हभप अभय महाराज जगताप हभप स्वामीराज महाराज भिसे, अमृता मोरे-देहूकर आदी मान्यवर या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. वारकरी कीर्तन महोत्सवातील कीर्तने रात्री ९.३० वा भरड, मालवण येथील दत्त मंदीरात होतील. शनिवार दि. ३० एप्रिल रोजी ह.भ.प. देवदत्त महाराज परुळेकर यांचे ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या विषयावर कीर्तन होईल. रविवार दि.१ मे रोजी ह.भ.प. अभय महाराज जगताप, सासवड पुणे यांचे ‘नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार’ या विषयावर कीर्तन होईल.

सोमवार दि. २ मे रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर घेरडीकर पंढरपूर यांचे ‘जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत’ या विषयावर कीर्तन होईल. मंगळवार दि. ३ मे रोजी ह.भ.प. स्वामिराज महाराज भिसे, आळंदी यांचे ‘तुका झालासे कळस॥’ या विषयावर कीर्तन होईल. कीर्तनाला आळंदी व पंढरपूर येथील पखवाजी व टाळकरी वारकरी साथ करणार आहेत. वारकरी सांप्रदायाचे कार्य तत्वज्ञान व इतिहास यांचा परिचय या कीर्तनांतून होईल. तरी जिज्ञासु व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९४२२०५५२२१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ऍड. परुळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page