ब्राह्मण मंडळ शाखा कणकवलीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
कणकवली ता.२२-:* आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आणि हिंदू धर्मातील धार्मिक संस्कारांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याबद्द्दल त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने कणकवली नायब तहसीलदार एस व्ही राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना कांचन काजरेकर, दुर्गेश काजरेकर, आनंद चिपळूणकर, शुभम चिपळूणकर, सुरेश जोशी, दत्ताराम जांभेकर, मंदार मराठे, अमित जोशी, दुर्गनंद जावडेकर, रवींद्र तांबोळकर, सागर मराठे, नीलंबरी जोशी, नारायण प्रभूदेसाई, प्रतिभा करंबेळकर, प्रतीक्षा पंडित, प्रांजली काजरेकर, किशोरी धुपकर, आदींनी या संदर्भातील निवेदन नायब तहसीलदार एस व्ही राठोड यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, ब्राह्मण समाजातील व हिंदू धर्मातील देशप्रेमी सर्वसामान्य नागरिक उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांचेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ , १५३ , १५३ , १६६ , २६८ , २ ९ ५ , २ ९ ५ , २ ९ ८ , ५०४,५०५ अन्वये दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या अमोल रामकृष्ण मिटकरी या व्यक्तीने १ ९ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात हजारोंच्या जनतेसमोर जाहीर भाषण करताना ब्राह्मण समाजाबद्दल आणि एकूण हिंदू धर्मातील धार्मिक संस्कारांबद्दल अत्यंत प्रक्षोभक आणि जातीयवादी तेढ निर्माण करणारी विधाने केलेली आहेत.
आमदार अमोल मिटकरी यांनी याआधीही आपल्या वाचाळ वाणीतून भारतीयांच्या भावना दुखावण्याचे आणि विविध धर्माच्या आणि जातींच्या बाबतीत चुकीची आणि पुरावाशून्य वक्तव्य करून भारतीय समाजात तेढ आणि दुजाभाव निर्माण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सदरहू मिटकरी यांचे भाषण भारत देशातील नव्हे तर जगाच्या कान कोपन्यातील ब्राह्मण समाजातील आणि सकल हिंदू धर्मातील भारतीय नागरिकापर्यंत प्रसार माध्यमांच्या द्वारे पोहोचले आहे. व त्यायोगे सदर भाषण आमच्या घरी प्रसारमाध्यमावर पाहताना आमच्यासारख्या तमाम हिंदू देशप्रेमी भारतीय नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. अमोल मिटकरी यांचे प्रक्षोभक भाषण आमचे राहत्या घरीही आम्ही पाहिले, वाचले आणि ऐकले असून त्यातून आमच्या भावना दुखावल्या आहेत तसेच त्याद्वारे जातीय, धार्मिक अशांतता निर्माण झाली आहे.
