महेश कांदळगावकर यांना खासदार राऊत, आमदार नाईक यांचे फोन…
मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिवसेनेत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून कांदळगावकर यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी भ्रमणध्वनी द्वारे त्यांच्याशी चर्चा करून निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, मुंबईत असणारे आमदार वैभव नाईक हे मुंबईहून परतल्यानंतर महेश कांदळगावकर यांची भेट घेणार असल्याची माहिती दस्तुरखुद्द आम. नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी काल बुधवारी अचानक कुटुंबाकडेकडे आणि व्यवसायाकडे गेल्या पाच वर्षात दुर्लक्ष झाल्याने यापुढे आपणाला शिवसेनेच्या पक्षीय कामाला वेळ देता येणार नाही असे पत्रकार परिषदेत पत्रकारांना प्रसिद्धीपत्रक देऊन जाहीर केले.
गेले काही महिने शिवसेनेत अंतर्गत असलेली धुसफूस आणि त्याकडे शिवसेनेच्या वरिष्ठांनी केलेले दुर्लक्ष याची परिणीती म्हणजे महेश कांदळगावकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र होय अशी खुलेआम चर्चा कांदळगावकर यांच्या निर्णयानंतर सुरू झाली होती. कांदळगावकर यांनी घेतलेल्या निर्णयानंतर कांदळगावकर यांच्या मित्र परिवाराने आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत चर्चा केली. या चर्चे दरम्यान कांदळगावकर यांनी शिवसेना सोडण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाची कारणमीमांसा केल्याचे आतील गोटातील वृत्त असून कांदळगावकर यांच्या निर्णयाला काही जणांनी मुकसंमती दिल्याची चर्चा आहे. तर आगामी मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्षानी तटस्थ राहून पक्षीय राजकारणाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, श्री. कांदळगावकर यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेत हलचल माजली असून शिवसेनेकडून वरिष्ठ स्तरावर कांदळगावकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी पत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्ष पदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महेश कांदळगावकर यांनी चांगले काम केले. जनहिताची अनेक विकासकामे त्यांच्या पुढाकारातून व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने झाली. कोरोना काळात काही विकासकामाना ब्रेक लागला. मात्र आगामी काळात ती कामे जनहिताची अन्य नवी कामे केली जातील. आगामी नगरपालिका निवडणूक महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढवावी हा निर्णय पक्षाने यापूर्वीच घेतला आहे. हुशार, अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख त्यांनी कायम जपली. मालवण शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
अनेक जेष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक यांनी संपर्क साधून महेश कांदळगावकर यांना मतपरिवर्तन करण्याबाबत सल्ला दिला आहे. मुंबईवरून आल्यावर दोन दिवसात मीही त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. लोकशाहीत जनता सार्वभौम असते. अश्याच सर्वसामान्य जनतेतून मला अनेक फोन आले. ‘आमदार साहेब तुम्ही व वरिष्ठांनी यात लक्ष घाला महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन करा’. या मालवण शहरातील जनतेच्या प्रतिक्रिया व महेश कांदळगावकर यांच्याबद्दल असलेला आदर निश्चितच आम्हालाही अभिमानास्पद आहे. असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही या विषयात लक्ष घातले आहे. खासदार यांनी महेश कांदळगावकर यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षस्तरावर कोणतेही विषय असल्यास त्याबाबतही शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे निर्णय घेतील. महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन निश्चित होईल. असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
