मालवण ता.१६-:* दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला सर्व शिक्षकांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शाखा मालवण या संघटनेने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. संघटनेतील तंत्रस्नेही शिक्षक राजेश भिरवंडेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व अमर वाघमारे आणि परशुराम गुरव यांच्या नेतृत्वाखाली ‘अखिल्स हेल्प डेस्कची’ निर्मिती करण्यात आली असून त्याची सुरुवात मालवणातून करण्यात आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन संघाचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर व मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या हस्ते झाले. या अखिल्स हेल्प डेस्कच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदली पोर्टल संबंधित कामे, PFMS संबंधित कामे, शालार्थ बीले तयार करणे, सरल मधील माहीती भरणे, स्कूल व स्टुडंट पोर्टल अद्ययावत करणे, शाळा सिद्धी माहीती, स्वच्छ विद्यालय माहिती, शालेय पोषण आहार माहिती आदी संबधी अपडेट्स व तांत्रिक सहाय्य तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्यात येणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख राजेश भिरवंडेकर यांनी दिली.
या उपक्रमासाठी तालुक्यातील पाच प्रभागातून एकूण २५ शिक्षकांची एक टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून हेल्प डेस्कचे काम करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षक संघाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत निर्माण केलेला हेल्प डेस्क ही काळाची गरज आहे. या उपक्रमामुळे शिक्षण विभागालाही तांत्रिक बाबतीत सहकार्य मिळणार आहे. तसेच तालुक्यातील शिक्षकांनी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले शालेय रेकॉर्ड परिपूर्ण ठेवावे,” असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी राज्य संयुक्त चिटणीस म.ल.देसाई, राज्य संघटक प्रशांत पारकर, जिल्हा सचिव श्री.बाबाजी झेंडे तालुका अध्यक्ष गुरुनाथ ताम्हणकर, सचिव गणेश सुरवसे, जिल्हा प्रतिनिधी सुभाष नाटेकर, श्रीकृष्ण बागवे, राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक शिवराज सावंत, सौ.स्नेहल राजम, जिल्हा मुख्याध्यापक प्रतिनिधी सौ.शर्वरी सावंत, सौ.प्रीतम पारकर, सौ.तेजल ताम्हणकर, सौ.मयुरी करलकर, सौ.पल्लवी राणे, सौ.स्मिता परब, दीपक वेंगुर्लेकर, कृष्णा गोसावी, केंद्रप्रमुख अन्वर शेख, प्रमोद गोसावी, रंगराव वडर, ज्ञानदेव तेली, देविदास प्रभुगावकर आणि अखिल भारतीय प्राथमिक संघटनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भिमाशंकर शेतसंदी यांनी केले, आभार प्रदर्शन पांडुरंग कोचरेकर केले.
