वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली येथे दि.२१ ते २७ एप्रिल २०२२ पर्यंत भव्य श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह पारायण-निरुपण-प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय व पुण्यकारक सोहळ्यात सातही दिवस, भगवान महाविष्णूंच्या विविध अवतार कथा तसेच श्रीकृष्ण चरित्राचे आपल्या प्रासदिक आणि रसाळ वाणीतून निरुपण करण्यासाठी प्रसिद्ध प्रवचनकार सिद्धयोगी भागवताचार्य प.पू.हरिभाऊ जोशी महाराज (हैद्राबाद) हे उपस्थित राहणार आहेत. तर वेदमूर्ती भालचंद्र जोशी व वेदमूर्ती श्रीनाथ रिगे (म्हापसा) हे श्रीमद् भागवत ग्रंथ-संहितेचे वाचन करणार आहेत.
दि.२० रोजी सायं.४.३० वा. शिरोडा माऊली मंदिर ते आरवली वेतोबा-सातेरी मंदिरपर्यंत भागवत ग्रंथ दिडी श्रीकृष्ण रथ शोभायात्रा, दि.२१ रोजी सकाळी ६.३० वा. श्री वेतोबा मंदिर येथे गांवकर मानकरी, पुरोहित, ब्रह्मवृंद, देवस्थान विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत मंगलाचरण, महागणपती पूजन, प्राकारशुद्धी, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापूजन, संभारदान, श्रीमद्धागवत पीठदेवता स्थापन व पूजन, ८.३० वा. श्री भागवत महापुराण ग्रंथ संहिता वाचन, दु. १ वा. नैवेद्य, दुपारी ४ ते ७.३० पर्यंत भागवताचार्य सिद्धयोगी प.पू.हरिभाऊ निटुरकर जोशी महाराज यांचे भागवत कथा निरुपण, प्रवचन, सायं.७.३० वा. आरती, तीर्थप्रसाद, रात्रौ ८.३० वा. स्थानिकांचे भजन, दि.२१ ते २७ पर्यंत रोज सकाळी ७.३० वा. भागवतपीठ देवता, पूजन आणि भागवत ग्रंथ संहिता वाचन, दुपारी नैवेद्य, दि. २१ ते २७ पर्यंत रोज दुपारी ४.३० ते ७.३० पर्यंत श्रीकृष्णलीला चरित्र कथन, आरती तीर्थप्रसाद व स्थानिकांचे भजन, दि. २३ रोजी श्रीकृष्ण जन्मसोहळा, गोवर्धन पूजा, दि. २९ रोजी दुपारी १ वा. श्रीमद् भागवत सप्ताह पारायण सांगता हवनविधी, देवतांस महानैवेद्य, आरती, भाविकांना महाप्रसाद होणार आहे. तसेच २८ एप्रिल रोजी सायं.७.३० वा. सुधाकर दळवी संचलित चेंदवणकर-गोरे संचलित चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळाचा श्रीकृष्णलीलेवर आधारीत महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या संपूर्ण सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक ब्राह्मण ऐक्यवर्धक सघ आरवली पंचक्रोशी यांनी केले आहे.
