सावंतवाडीत कुळाच्या जमिनीत केला गोलमाल

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

कणकवली १३ एप्रिल(प्रतिनिधी)– सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कारभारात गोलमाल सुरू आहे. तेथील तक्रारी वाढत असून सध्या तेथील अनेक प्रकरणे गाजत आहेत. तर केसरी गावातील एका जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर कडून प्रत्येकी तीन हजार रुपये आपण घेत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडे सावंतवाडी तहसीलदारांनी कबूल केले होते. वाळू असलेला बिनपासी डंपर पकडून त्यात ग्रीट असल्याचे दाखवत लाखो रुपये घेत तो डंपर सोडला. असे खळबळजनक आरोप करीत त्याबद्दल आपल्याकडे पुरावे असल्याची माहिती मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी दिली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते.

परशुराम उपरकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तहसीलदारांची झालेली बदली रोखण्यासाठी जमीन व्यवहारातील दलाल आवाज उठवत होते. त्या दबावातून आमदार दीपक केसरकर यांनी बदली स्थगित केली होती. जमीन व्यवहारात उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात कोणतेही निवाडे चालवू नका असे निर्देश दिले होते. मात्र, कूळ कायद्याच्या निवाड्यात किमान ४ वर्षे लागत असताना केवळ ३ अथवा ४ सुनावण्यात कुळ कायद्याचा निवाडा देण्यात आलेला आहे. तसेच तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडून कुळ जमिनी विक्रीसाठी ४३ ग ची परवानगी दिल्याची अनेक उदाहरणेही आहेत.

तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांताधिकारी खांडेकर, आणि तहसीलदार म्हात्रे यांनी संगनमताने केलेले निवाडे तपासून घेण्याची गरज आहे.तहसीलदारांनी दावा सुरू असलेल्या व्यक्तींकडे आर्थिक मागणी केल्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे असून ती लवकरच व्हायरल करण्यात येईल.असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला. केसरीतील वनसंज्ञा असलेल्या जागेत वृक्षतोड करून उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची आम्ही तक्रार केली होती. त्याबाबतही सखोल चौकशीची गरज आहे. येत्या शनिवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अन्यायग्रस्त जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सावंतवाडी मनसे कार्यालयात आपण उपस्थित राहणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page