गुणवत्ता विकसित होत गेल्यास साहित्यात पुढे जाण्यासाठी गॉडफादरची गरज नाही

ओसरगाव प्रा.शाळेत कवी अजय कांडर यांच्याशी मुलांचा संवाद

कणकवली 6 एप्रिल (प्रतिनिधी)- शालेय जीवनात जे साहित्याचे संस्कार होतात त्यातून मुलं मोठ होण्याची स्वप्न बघत असतात. या पार्श्वभूमीवर ओसरगाव प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक किशोर कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘विद्यार्थ्यांचा कवीशी संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करून मुलांना लहान वयात साहित्य लेखन करण्याची प्रेरणाच दिली आहे. बालपणापासून निष्ठेने साहित्य लेखन केले तर मोठेपणी ती गुणवत्ता यशाच्या शिखरावर घेऊन जाते. त्यामुळे गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकाला पुढे जाण्यासाठी कुठल्याही गॉडफादरची गरज नसते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी ओसरगाव येथे केले.

ओसरगाव प्राथमिक शाळेमध्ये ‘विद्यार्थ्यांचा कवीशी संवाद’ या उपक्रमाअंतर्गत कवी अजय कांडर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रणय परब सोनिया आंगणे, दिव्या राणे , वैभवी अपराध या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या मुलाखतीत बोलताना कवी कांडर यांनी ओसरगाव शाळेच्या या कार्यक्रमाचे अनुकरण जि. प.च्या इतरही जिल्ह्यातील शाळांनी करावे असे आवाहन केले.माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ऍड. विलास परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया अपराध, जगन्नाथ राणे ,लक्ष्मण आंगणे ,ग्रामपंचायत सदस्य अक्षता राणे,केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, मुख्याध्यापक किशोर कदम, शिक्षिका राजश्री तांबे, शीतल दळवी. शिल्पा परब, पालक अपेक्षा चव्हाण, रूपाली परब आदी उपस्थित होते.

श्री कांडर म्हणाले, शाळेतील उत्तम सांस्कृतिक उपक्रमातून चांगले साहित्यिक संस्कार होऊन पुढे मोठे लेखक-कवी झालेल्या साहित्यिकांची संख्या मराठी सहित्यात मोठी आहे. त्यामुळे ओसरगाव शाळेने आयोजित केलेल्या ‘विद्यार्थ्यांचा कवीशी संवाद’ या उपक्रमाचे मोल मोठे आहे. माझे बालपण बावशी सारख्या छोट्या खेडेगावात गेले. तिथे आणि घरातही साहित्य परंपरा नाही. मात्र गावातील वारकरी भजन परंपरेच्या संस्कारातून शालेय जीवनापासूनच कविता लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मोठे स्वप्न बघितलं तरच मोठं होता येत.

यासाठी साहित्यलेखन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून मोठ्या झालेल्या साहित्यिकांचा आदर्श आपल्या समोर ठेवायला हवा. संपूर्ण कोकणपट्टीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आज चांगली कविता लिहिली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य परंपरा फार मोठी आहे. आपल्यात साहित्यिक गुणवत्ता असेल तर साहित्यक्षेत्रात पुढे जाण्यासाठी कोणत्याही गॉड फादरची गरज नाही. तुमची लेखनाची गुणवत्ता तुम्हाला मोठे बनवत असते. मात्र यासाठी व्यक्तिगत द्वेषापासून दूर राहण्याची गरज असते.

साहित्य क्षेत्रात दुसऱ्याचा द्वेष केला तर आपण संपून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्मळ मनातून लेखन करणे म्हणजेच पुढे जाणे होय! अँड. विलास परब म्हणाले, ओसरगाव शाळेचा शतक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानंतर अजय कांडर यांच्या सारख्या नामवंत कवीचा कार्यक्रम येथे होत आहे. या शाळेच्या दृष्टीने ही महत्वाची घटना आहे. यामागे या शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम आणि त्यांचे इतर सहकारी तसेच केंद्रप्रमुख श्री हरकुळकर यांचे कष्ट आहेत.कवी अजय कांडर यांची येथे होणारी मुलाखत ही डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवण्यात येणार आहे. यावेळी शाळेच्या संगणक विभागातील नव्या प्रिंटरचे उद्घाटन अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कांडर यांचा सत्कार अँड. विलास परब यांच्या हस्ते करण्यात आला.

You cannot copy content of this page