सभासद कर्जदाराला आता ९.५० टक्के व्याज

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेचा निर्णय

सावंतवाडी,दि.६ एप्रिल (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेने गेल्या सात वर्षात अतिशय उल्लेखनीय प्रगती केली असून सभासद कर्जावरील व्याजदरात सन २०१४-१५ पासुन १२.५० टक्क्या वरुन टप्याटण्याने कपात करून दि.१ एप्रिल पासुन द.सा.द.शे ९.५० टक्के केला आहे.

हा व्याजदर यापूर्वी घेतलेल्या कर्जालाही लागू राहणार आहे. तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेने खेळत्या भांडवलाचा रु.१०० कोटीचा टप्पाही पार पाडला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. भाग्यवंत य. वाडीकर यांनी दिली. या संचालक मंडळाने सन २०१४-१५ मध्ये कार्यभार स्वीकारला तेव्हा संस्थेचे भागभांडवल रु.१०.१७ कोटी होते ते आज मितीस रु.११.१५ कोटी झाले आहे. तसेच सभासद ठेवी रु.१५ कोटी वरुन आज मितीस रु.६६ कोटी झाल्या आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षांत २०२१-२२ मध्ये उच्चांकी रु.७२ कोटीचे कर्ज वाटप झाले असून दि.३१ मार्च २०२२ अखेर एकुण सभासद कर्ज येणे रु. ७९ कोटी आहे.

तसेच दि.३१ मार्च २०१५ अखेर संस्थेचा नफा २.१८ कोटी होता. त्यानंतर संस्थेने कर्जावरील व्याजदरात वेळोवेळी कपात करुनही दि.३१ मार्च २०२२ अखेर संस्थेला २.८९ कोटी नफा झालेला आहे. दरवर्षी या संचालक मंडळाने सभासदांना १५ टक्के लाभांश दिला असुन शिल्लक नफ्यातुन दरवर्षी सभासदांना भेट ठेवपावती वितरित केली आहे तसेच ऑडिट वर्ग हि “अ” कायम राखला आहे. या संस्थेची निवडणुक सन २०१५ मध्ये होऊन विद्यमान संचालक मंडळ बिनविरोध निवडुन आले होते. त्यावेळी संस्थेचे आर्थिक हित लक्षात घेऊन आजी-माजी संचालक व काही सभासद यांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध केली होती.

तसेच भविष्यात होणारी निवडणुकही बिनविरोध होण्याचे दृष्टीने आजी-माजी संचालक, सर्व सभासदानी व पतसंस्थेच्या हितचिंतक यांनी संस्थेचे आर्थिक हित लक्षात घेऊन यशस्वी प्रयत्न करावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. वाडीकर यांनी केले. सुधारित सहकारी कायद्यानुसार संस्थेच्या निवृत्त होणाऱ्या सभासदांना नाममात्र सभासदत्व ठेऊन संस्थेकडे ठेवी ठेवता येतात. अशा नाममात्र सभासदांच्या ठेवींवर संस्था अर्धा टक्का जादा व्याजदर देते, तरी याचा फायदा सेवानिवृत्त होणा-या सभासदांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री. वाडीकर व सचिव निलेश कुडाळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page