स्वच्छतेत बापर्डे, परुळेबाजार कोकण विभागात प्रथम, द्वितीय

२०१९-२० चा निकाल सीईओ प्रजित नायर यांनी केला जाहीर;दोन्ही ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेला ठरल्या पात्र

ओरोस ता.०६-:*   संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० या आर्थिक वर्षातील स्पर्धेत कोकण विभागात देवगड तालुक्यातील बापर्डे ग्राम पंचायतने प्रथम तर वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

 यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, देवगड गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, बापर्डे सरपंच संजय लाड, ग्रामसेवक शिवराज राठोड, परुळे बाजार सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनीषा नेवाळकर, ग्रामसेवक शरद शिंदे, संतोष पाटील, प्रवीण काणकेकर आदी उपस्थित होते.  

   यावेळी पुढे बोलताना नायर यांनी, बापर्डे व परुळे बाजार या दोन्ही ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. कोकण विभागात प्रथम आल्याने बापर्डे ग्रामपंचायतला दहा लाख रुपयांचे तर द्वितीय आलेल्या परुळे बाजार ग्रामपंचायतला आठ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी नायर यांनी दोन्ही ग्रामपंचायत सरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

You cannot copy content of this page