न्यायालयाने त्यांची केली जामिनावर मुक्तता
मालवण ता.०५-:* गेले आठवडाभर गाजत असलेल्या तळगाव येथील बेकायदेशीर बैल झुंज प्रकरणातील स्पर्धेचा विजेता चषक काल मालवण पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर या स्पर्धेची पारितोषिके पुरस्कृत करणाऱ्या सुनील सुभाष मांजरेकर आणि अनिल सुभाष मांजरेकर या दोघा संशयितांना मालवण पोलिसांनी आज मंगळवारी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी सात हजार पाचशे रुपयाच्या जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने ऍड. स्वरूप नारायण पई यांज काम पाहिले. गेल्या आठवड्यात तळगाव येथे बेकायदेशीररित्या बैल झुंज आयोजित करण्यात आली होती.
या बेकायदेशीर बैल झुंजीत कुडाळच्या रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या अर्जुन नामक बैलाने वेंगुर्ल्याच्या विकी उर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बाबू नामक बैलाचा झुंजीत पराभव केला होता. या झुंजीत बाबू हा बैल मृत्युमुखी पडला होता. या झुंजी प्रकरणात मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा संशयितांच्या अटकेची व जामीनाची कार्यवाही पूर्ण झाली होती. दरम्यान या वादग्रस्त बैल झुंज आयोजनातील विजेता कोकण किंग २०२२ हा चषक पोलिसांनी कुडाळ येथील राजाराम कुंभार यांच्या घरातून जप्त केला होता.
या बैल झुंज दरम्यान जखमी झालेल्या वेंगुर्ले येथील एका बैलाचा मृत्यू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे पडसाद उमटले. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या १२ मुख्य संशयित पैकी बैल झुंज आयोजनातील पारितोषिक पुरस्कृत करणारे सुनील सुभाष मांजरेकर व अनिल सुभाष मांजरेकर या दोघांना मालवण पोलिसांनी मंगळवारी अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांची प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. अन्य अज्ञात संशयित आरोपी यांचाही शोध सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले.
