जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने
सिंधुदुर्गनगरी ता ०४ महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सोमवार ४ एप्रिल पासून आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आजच्या दूसऱ्या दिवशीही महसुल कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी ४ एप्रिल पासून संप पुकारुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.आजच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरु ठेऊन तसेच जोर-जोरात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मंत्रालयीन स्तरावर अव्वल कारकून सवंर्गात पदान्नतीचे प्रलंबित असलेले प्रस्ताव, विभाग निहाय मान्यता देवून नायब तहसिलदार पदोन्नतीचे आदेश तात्काळ निर्गमित करावे , महसूल सहायकांची , रिक्त पदे तातडीने भरावीत,अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी नायब तहसिलदार पदी पदोन्नती द्यावी, या मागण्यांसाठी महसुल कर्मचारी बेमुदत संपावर आहेत . शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने, काळया फीती लावून कामे केली, शासनाचा निषेध म्हणून रक्तदान शिबीर आयोजीत करुन रक्त संकलन केले.
तरीही शासनाकडुन कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सर्वांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेत ४ एप्रिल पासून सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पदोन्नत नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक ,इत्यादी कर्मचाऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व निदर्शने सुरु केली आहेत.
जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त आमचा लढ़ा सुरूच राहील असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तहलिसदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील एकुण ३५५ कर्मचाऱ्या पैकी ३०० पेक्षा अधिक महसूल कर्मचारी व १९ नायब तहसिलदार बेमुदत संपावर आहेत.तर राज्य संघटनेकडुन पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत दररोज जिल्हा स्तरावर निदर्शने करण्यात येणार असल्याचे महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान मालवे यांनी जाहीर केले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संतोष खरात ,श्रीम.दर्शना चव्हाण , शिवराज चव्हाण ,संभाजी खाडे , रमेश कांबळे , उमेश काळे , स्वप्निल प्रभु , शाम लाखे , अशोक पोळ,राजेश्वर राठोड ,नरेंद्र एडके, महेश चव्हाण, उमेश राठोड ,आदी पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,काट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी पाठिंबा दिला असल्याचे यावेळी महसुल संघटना जिल्हाध्यक्ष सखाराम मालवे यांनी सांगितले .
प्रमुख मागण्या नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३१ टक्के वरून २० टक्के करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा, महसूल सहाय्यकाची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, सुधारित निकषानुसार पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडावी, महसूल विभागातील कार्यरत असलेली अस्थायी स्वरूपाची पदे स्थायी करण्यात यावी ,यासह विविध १५ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून शासनाचे लक्ष वेधले आहेत. याबाबत होणाऱ्या शासन निर्णयावर पुढील आन्दोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संपामुळे आजही कामकाज ठप्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य महसूल कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तसेच या विभागातील ४५ टक्के पदे रिक्त आहेत. तर काही कर्मचारी रजेवर आहेत. त्यामुळे जिल्हा मुख्यालय महसूल विभागासह सर्व तहसील कार्यालयतील कामकाज गेले दोन दिवस ठप्प झाले असून सर्व सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
