धामापूर ते नेरूरपार रस्त्यावर शाळेकडे गतिरोधक घाला…

पेंडुर येथील शिवसैनिकांची सार्वजनिक बांधकाम उपविभागकडे निवेदनाद्वारे मागणी

मालवण ता.०५-:* मालवण नेरुरपार कुडाळ या मार्गावरील धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढल्याने पेंडूर विभागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी काळसे गावात श्री. शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि जि. प. प्राथमिक शाळा न. १ येथे गतिरोधक घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कनिष्ठ अभियंता नितिन दाणे यांना निवेदन दिले आहे .

काळसे धामापूर मधील ग्रामस्थांनी वाहनांच्या जीवघेण्या वेगाला आवर घालण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ग्रामस्थांच्या या मागणीचा पाठपुरावा म्हणून पेंडूर विभागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी काळसे गावात गतिरोधक घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणला निवेदन दिले. यावेळी पेंडूर शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम , पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बाळ महाभोज , बाबू टेंबुलकर , विष्णू लाड , आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण – कुडाळ मुख्य रस्त्यावर धामापूर ते नेरुरपार दरम्यान च्या परिसरात रस्त्याकडेला मोठी लोकवस्ती आहे तसेच प्राथमिक शाळा आणि काळसे हायस्कूलही रस्त्याकडेलाच आहे. या मार्गावरून चिरे, वाळू वाहतूक करणारे अनेक डंपर तसेच गोवा येथून मालवणच्या दिशेने पर्यटकांना घेउन जाण्याऱ्या मिनीबस आणि टेंपो ट्रॅव्हलर भरधाव वेगाने ये जा करतात. अशावेळी रस्त्याकडेला शाळा असल्याने विद्यार्थीही रस्त्यावर प्रवास करत असतात. भरधाव वाहनांमुळे मुलांच्या जिवीतास धोका पोहोचू शकतो त्यामुळे अनेक पालक आणि जागरूक ग्रामस्थांनी वारंवार धामापूर भगवती मंदिर ते नेरुरपार होबळीचा माळ या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान चार ठिकाणी तरी गतिरोधक घालावे अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरूनच शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास गतिरोधक उभारणीसाठी लेखी निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page