किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच मोहीम…

*💫मालवण दि.११-:* सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजली जाणारी सागरी सुरक्षा कवच मोहिम मंगळवार १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होत आहे. वेंगुर्ले ते विजयदुर्ग या किनारपट्टी भागात ३६ तास ही मोहीम चालणार आहे. पोलीस प्रशासनाच्या रेड व ब्ल्यू टीम मोहिमेत सहभागी होणार असून रेड टीमचे कवच भेदण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची ब्ल्यू टीम सज्ज झाली आहे. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किनारपट्टी भागात दरवर्षी सागर सुरक्षा कवच मोहिम राबविण्यात येते. या मोहिमेत पोलीस दल, तटरक्षक दल, बंदर विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी होतात. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून या सागर सुरक्षा कवच मोहिमेस सुरवात होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. विजयदुर्गमध्ये ३ पोलीस अधिकारी, १४ कर्मचारी, देवगडमध्ये ७ अधिकारी, २६ कर्मचारी, आचरेमध्ये २ अधिकारी, १४ कर्मचारी, मालवणमध्ये ४ अधिकारी, २७ कर्मचारी, निवतीमध्ये २ अधिकारी, १६ कर्मचारी आणि वेंगुर्लेमध्ये २ अधिकारी, १८ कर्मचारी असे २० पोलीस अधिकाऱ्यांसह ११५ पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. सागरी सुरक्षा कवच मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर सागरी महामार्गासह मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. शिवाय समुद्रात दिवसा व रात्रीच्यावेळी गस्त घातली जाणार आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील वेंगुर्ले ते विजयदुर्ग या भागात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. रेड टीमला आपल्या हद्दीत घुसू न देण्यासाठी येथील ब्ल्यू टीम सज्ज असेल. १३ रोजी रात्री आठ वाजता या मोहिमेचे विसर्जन होईल.

You cannot copy content of this page