“त्या” बैल झुंजीतील ‘कोकण किंग 2022’ चषक पोलिसांनी केला जप्त…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीतील विजेत्या अर्जुन बैलाचे मालक रुपेश पावसकर याना देण्यात आलेला विजेता कोकण किंग २०२२ हा चषक मालवण पोलिसांनी कुडाळ येथील राजाराम कुंभार यांच्या घरातून जप्त केला आहे.

दरम्यान, तळगाव येथील बैल झुंज प्रकरणातील आयोजक व मालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या झुंजीच्या स्पर्धांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मालवणने केली आहे मालवण तालुक्यातील तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीत कुडाळच्या रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या अर्जुन नामक बैलाने वेंगुर्ल्याच्या विकी उर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बाबू नामक बैलाबरोबर झुंज झाली होती या झुंजीनंतर बाबू हा बैल मृत्यूमुखी पडला होता या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात याचे पडसाद उमटले. प्राणीमित्र संस्थेच्या माध्यमातून प्राप्त तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. १० संशयितांच्या अटकेची व जामिनाची कार्यवाहीही पूर्ण झाली.

दरम्यान, या वादग्रस्त बैल झुंज आयोजनातील विजेता चषक ‘कोकण किंग २०२२’ हा मालवण पोलिसांनी जप्त केला आहे. मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने पोलीस तपासादरम्यान हा चषक जप्त केला आहे. जप्त केलेला चषक मालवण पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी सोमवारी दिली आहे.

You cannot copy content of this page