३५ कोटी ५९ लाखांचा शिलकी अर्थसंकल्प

सावंतवाडी नगरपरिषद:प्रशासनाने केला सादर;आरोग्य, पाणी, रस्ते, स्वच्छतेला प्राधान्य

सावंतवाडी ता.०४-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि कार्यकारणीचा कार्यकाल संपल्यानंतर नगरपरिषदावर प्रशासक नेमला आहे. त्यामुळे यंदाचा सावंतवाडी नगरपरिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प प्रथमच प्रशासकाकडून मांडण्यात आला आहे. शिलकी अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला. यामध्ये अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ एवढी आहे. सावंतवाडी नगरपरिषदवर १७ डिसेंबरपासूनच प्रशासक म्हणून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर काम पाहत आहेत. तर मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे मुख्याधिकारी म्हणून प्रशासनाचा कारभार हाकत आहेत. प्रशासक श्री.पानवेकर यांनी हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला .

अर्थसंकल्पाबाबत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर पब्लिक डॉक्युमेंट्स असल्यामुळे नगर परिषदेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येणार असल्याचे सांगितले सावंतवाडी नगरपरिषदचा इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प प्रशासकांमार्फत मांडण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ एवढी आहे. अर्थसंकल्पात शहर विकासाच्या दृष्टीने आरोग्य, पाणी, रस्ते आणि स्वच्छता अभियान यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पालिकेच्या तिजोरीत भर टाकण्याच्या दृष्टीने भाडेवाढ, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील थकित भाडे वसूल करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

एकूण ३७ कोटी २० लाख ६१ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प असून अखेरची शिल्लक ३५ कोटी ५९ लाख ६६ हजार १४१ रुपये तर शिल्लक ३८ कोटी ४७ लाख २८ हजार ५४१, जमा ३४ कोटी ३२ लाख ९९ हजार रुपये दाखविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट होता. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत विशेष मोहीम राबवण्याची वेळ नगरपरिषद प्रशासनावर आली. कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे शासनाकडून येणारा विकासात्मक निधी ठप्प झाला होता. तसेच हंगामी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

गेले चार महिने प्रशासक कारभार हाकत आहेत. या कालावधीत घरपट्टी शंभर टक्के वसुली, पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तिजोरी पुन्हा भरू लागली. महिला कल्याणकारी योजना, प्रसाधनगृहे, ओपन जिम, जिमखाना मैदान खेळपट्टी विकासासाठी १२ लाख तसेच साहित्य चळवळ व ग्रंथालय वृद्धीसाठी एक लाख रुपयांची तरतूद केली आहे. इन्डोअर गेममधील शुल्कवाढ, शिल्पग्राम जमीन भाडे, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडे वसुलीकडे विशेष लक्ष देऊन नगरपरिषदेच्या तिजोरीत भर घालण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष केंद्रीत आले आहे. सावंतवाडी शहरातील भूसंपादन प्रस्ताव व मोजणी करून सावंतवाडी नगरपरिषदेच्या ताब्यातील मालमत्ता यांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान शंभर टक्‍के घरपट्टी वसुली करिता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी धडक मोहीम सुरू केली आहे बऱ्याच प्रॉपर्टी व दुकान गाळे घरपट्टी न भरल्याने सीलबंद करण्याची ही कारवाई करण्यात आली आहे

You cannot copy content of this page