ती इमारत पाडण्यामागे आम. नितेश राणे सूत्रधार ?;शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांचा सवाल
कणकवली ता.०४-: कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील मोरये बिल्डिंग भाडोत्र्यांना विश्वासात न घेता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी बिल्डरांना हाताशी धरून रातोरात पाडली. कणकवली शहरातील या दुर्दैवी घटनेवर आमदार नितेश राणे गप्प का ? असा सवाल शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सदर इमारत पाडण्यामागे आमदार नितेश राणेच सूत्रधार आहेत काय ? असा आमचा संशय असल्याचा आरोप कन्हैया पारकर यांनी करतानाच जर कुणी दहशतीने असे प्रकार करत असेल तर शिवसेनेकडे तक्रार करा , आम्ही पुर्ण ताकदिनीशी त्यांच्या पाठीशी राहू असेही कन्हैया पारकर यांनी सांगितले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शहर शिवसेनेच्यावतीने नगरसेवक कन्हैया पारकर , रुपेश नार्वेकर , शहरप्रमुख शेखर राणे , न.पं. विरोधीपक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली .
यावेळी असेसमेंटधारक दत्तात्रय म्हापसेकर , भाडेकरू जयेश धुमाळे डॉ . सुनिल रेवडेकर , अलका कदम , तसेच सुनिल पारकर आदी उपस्थित होते . कणकवली येथील पटवर्धन चौकानजिकची जी इमारत पाडण्यात आली , त्यात दत्तात्रय म्हापसेकर यांच्या नावे असेसमेंट असलेला भागही पाडण्यात आला . याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही .
आम्ही सत्तेत असलो तरीही श्री . म्हापसेकर व भाडेकरूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शहर शिवसेनेच्यावतीने दिला . अवैध धंद्यांबाबतचे जे आरोप नगराध्यक्षांनी केलेत ते धंदे त्यांनी बंद करावेत . मात्र , न्यायदेवतेने कैदेची शिक्षा सुनावलेल्या नगराध्यक्षांनी निरपराध सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा देण्याची गरज होती . परंतु ते पदावर आहेत , हेच दुदैव असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली . सदरची इमारत रातोरात पाडण्यात आली ती जर धोकादायक झालेली होती , तर रात्री २ वा . पाडण्याची गरज काय ? तसेच लोकांना विश्वासात का घेतले गेले नाही . अशाप्रकारे जमिन खरेदी करणारे बिझनेसमन असतात . ते भाडेकरूंसोबत तडजोड करता .
मात्र , येथे गुंडगिरी करून त्यांना हाकलून लावण्यात आले श्री . म्हापसेकर यांचे १ ९ ८७ पासून असेसमेंट आहे . त्यांच्याकडे घरपट्टीच्या पावत्याही आहेत . त्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत घरपट्टी भरलेली असून त्याच तारीखचा असेसमेंटही त्यांच्याकडे आहे त्यामुळे नगरपंचायतीच्या करदात्याला न्याय देण्याची भूमिका ही विश्वस्थांची असायलाच हवी . मात्र , येथे त्यांना उध्वस्थ केले जात असल्याचा आरोपही श्री . पारकर यांनी केला. निर्लेखनाची नोटीस काढलेली भाजीमार्केटची इमारत आजही जैसे थेच आहे .
त्याबाबत कारवाई काय झाली . त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे , त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे शिवसेना या सर्वांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे . श्री . म्हापसेकर यांनी तक्रार देऊन चार दिवस झाले तरीही गुन्हा दाखल झालेला नाही . पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे ? आम्ही सत्तेत असलो तरीही या अन्यायाविरूद्धा प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही घेऊ , असा इशाराही श्री . पारकर यांनी दिला . संदेश पारकर यांनी बिल्डींग पाडण्याबाबत जे मुद्दे उपस्थित केले होते , त्याला बगल देत टीका करण्यात आली . जर शहरात अवैध धंदे असतील तर त्यांचे आमदार आहेत , शहरात सत्ता आहे , त्यांनी बंद करावेत . मात्र , अशाप्रकारे अन्याय होत असताना आमदार एक शब्दही बोलत नाहीत . भूमिका मांडत नाहीत . त्यामुळे याचे मुख्य सुत्रधार ते असू शकतात , असा आमचा संशय आहे .
संदेश पारकर हे १ ९९ ३ पासून सरपंच होते . जे आपल्या सोबतीचे सांगतात , त्यांची सुरूवात २००० पासून आहे . त्यांची राजकीय शाळा संदेश पारकरांपासूनच सुरू झाली . ज्यांची त्यांच्याच आमदारांबाबतची भूमिका सर्वज्ञात आहे , तेथे पारकरांबाबत काय अपेक्षा ठेवायची ? असा सवाल कन्हैया पारकर यांनी केला .
