वेंगुर्ला ता.०४-:* आपल्या अभ्यासपूर्ण सुत्रसंचालनासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांच्या सुत्रसंचालनाने गोवावासीयांनाही भुरळ पाडली आणि खुद्द गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रा.खानोलकर यांचे कौतुक करत शाल व सन्मानचिन्ह प्रदान करीत त्यांचा गौरव केला.
कोरोना काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटवल्यानंतर गोवा राज्यात पर्यटन महोत्सव कार्याक्रमाचा दिमाखदार सोहळा गोव्याची राजधानी पणजी येथे नुकताच संपन्न झाला. यात विविध लोककला आणि विविध प्रांतातील कर्तृत्व संपन्न व्यक्तीमत्वाचा गौरव माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिधुदुर्गचे सुपुत्र, उपक्रमशील अध्यापक, युवावक्ते, दशावतार लोकला अभ्यासक आणि सुप्रसिद्ध निवेदक प्रा.वैभव खानोलकर यांनी करीत आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातुन आणि ओघवत्या शैलीतुन व्यासपिठावरील मान्यवर उपस्थित रसिकांसह गोवा राज्यांचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांचेही मन जिंकत वाहवा मिळवली.
गोव्याचा इतिहास आणि विविध संस्कृतीचा मिलाफ असणारे गोवा या विषयीचा समग्र आढावा घेताना गोव्यातील नररत्ने व त्याची विश्वव्यापी कामगिरी यांचे प्रा.खानोलकर यांनी केलेले वर्णन गोवेकरांना विशेष भावले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी‘ या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजित पडते उपस्थित होते.
