मालवण (प्रतिनिधी) गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे सण ,उत्सव,आणि कार्यक्रमापासून दूर फेकल्या गेलेल्या सर्वानाच प्रथमच कोरोना निर्बंधांपासून मुक्ती मिळाल्यानंतर प्रथमच आलेल्या गुढीपाडवा आणि त्यातच हिंदू नववर्ष याचा आनंद आज मालवणात मनसोक्तपणे लुटण्यात आला दोन वर्षानंतर आज मालवणात हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासीयांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे हे १९ वे वर्ष होते.
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथून या भव्य स्वागत यात्रेस प्रारंभ झाला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. ही स्वागत यात्रा भरड येथून बाजारपेठ मार्गे बंदर जेटी ते फोवकांडा पिंपळ ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी काढण्यात आली. या यात्रेत पारंपारीक हिंदू वेशातील तसेच भगवे फेटे परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. तर बच्चे कंपनीने विविध आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मालवण येथील महिला ढोल पथकातील महिलांनी ढोल वादनाने आसमंत दणाणून सोडला.
तसेच सजवलेल्या बैलगाड्या, उंट व घोडे यांनीही लक्ष वेधले. यात आडारी, रेवतळे, कुंभारमाठ येथील सजावट केलेल्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. वेशभूषा केलेली बच्चेकंपनी बैलगाड्यांमध्ये सवार झाली होती. या यात्रेत खुडी देवगड येथील हेदूबाई प्रासादिक भजन मंडळाने विविध भजने व दिंडी नृत्य सादर करत यात्रेत भावभक्तीचे रंग भरले.
तर नेरुर सायचे टेंब शिमगोत्सवातील बाबा मेस्त्री ग्रुपचे रोंबाट सहभागी झाले होते. यामधील गणपतीसह देवदेवता व प्राण्यांच्या भव्य प्रतिकृतींनी व नृत्याने यात्रेत रंगत आणली. तसेच कोल्हापूर येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाड्याच्या सदस्यांनी विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करत लक्ष वेधले. तर स्कुटर व बुलेट चालवीत महिला सहभागी झाल्या होत्या.
या स्वागत यात्रेत आम. वैभव नाईक यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जि.प. सदस्य हरी खोबरेकर, बबन शिंदे, सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, यतीन खोत, आपा लुडबे, मंदार केणी, गणेश कुशे,महेश जावकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा करलकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, शिल्पा खोत, मेघा सावंत, पूनम चव्हाण, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, किरण वाळके, उमेश मांजरेकर, विकी तोरसकर, विलास हडकर, दीपक पाटकर, रत्नाकर कोळंबकर, शेखर गाड, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, महेश मांजरेकर, बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अविनाश सामंत, संमेश परब, ललित चव्हाण, मंदार ओरोसकर , यांसह मालवणमधील लोकप्रतिनिधी व बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.
