सृजनाच्या वाटांच्या माध्यमातून मुलांशी संवाद

कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे आयोजन

कणकवली.०२-:* कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ‘ शाळा – घर – शाळा ‘ आणि ‘ अभ्यास एके अभ्यास ‘ या चक्रातून बाहेर पडून मुलांचं मन जाणून घेण्याचा एक प्रयत्न ‘सृजनाच्या वाटा ‘ या उपक्रमातून करण्यात येणार आहे.

चित्र , संगीत , शिल्प , नाटक करता करता स्वतःला सजवणारा हा आरसा आहे . निसर्गाच्या रम्य आणि प्रशस्त परिसरात , रंगकर्मी डॉ . राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली , वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने चार वर्षे ‘ सृजनाच्या वाटा ‘ हा उपक्रम राबविला होता. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यावर्षी पुन्हा तो उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने कार्याध्यक्ष ऍड. एन. आर. देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.

वर्षभर दर शनिवारी सायंकाळी ६.३० ते ९ . ३० या वेळेत चालणाऱ्या या निरंतर उपक्रमाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे . कवी , नाटककार , चित्रकार , संगीतकार डॉ . राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा निरंतर उपक्रम चालतो . कथा , कविता , निबंध वाचन , गाणी म्हणत , चित्र काढत , शिल्प घडवत , नाटक करत , चित्रपट पहात ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो . चांगला माणूस घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम म्हणजे एक संस्कारमंच आहे . या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत या उपक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलांचे बालनाट्य निर्माण करण्यात येणार आहे .

बालनाट्य चळवळीतील पुण्याचे तरुण रंगकर्मी निखिल गाडगीळ यांच्या दिग्दर्शनाखाली या बालनाट्याची निर्मिती केली जाणार आहे . १६ एप्रिल ते ६ मे २०२२ पर्यंत त्याची दररोज तालीम होणार असून ७ मे रोजी या बालनाट्याच्या शुभारंभाचा प्रयोग आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात करण्याचे नियोजन केले आहे . ज्या पालकांना या उपक्रमात आपल्या पाल्याला प्रवेश घ्यावयाचा आहे , तसेच या बालनाट्यात अभिनय करण्याची संधी द्यावयाची आहे त्यांनी या उपक्रमाची माहिती पुस्तिका आणि प्रवेश अर्ज सिमा कोरगांवकर , कार्यकारिणी सदस्या , वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान , द्वारा सोनाली झेरॉक्स सेंटर आणि एल.आय.सी. हप्ता भरणा केंद्र , पू। अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे संपर्क करावा. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्ज १५ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण भरून संस्थेकडे सादर करावयाचा आहे . या उपक्रमात ३० जणांसाठी प्रवेश मर्यादीत आहे .

You cannot copy content of this page