बैल झुंज प्रकरणी १० ही संशयितांना जामीन मंजूर…

प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयाच्या जामिनावर सशर्त मुक्तता…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी येथे बेकायदेशीररित्या बैलांच्या झुंजीचे आयोजन करून एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात कालमालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी आज शुक्रवारी शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, कुडाळ येथील शिवसेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांवर अटक करण्यात आली. आज दुपारी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांच्या जामिनावर सशर्त मुक्तता केली. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. स्वरूप पई यांनी काम पाहिले. मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावानजीक दोन दिवसांपूर्वी बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होते. हजारो लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचे निधन झाले. या घटनेबद्दल सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनतर प्राणी मित्र संघटनानी एकत्र येत त्या व्हिडिओ मधील व्यक्तींची खातरजमा करून आयोजकांबाबत माहिती मिळवली.

या प्रकरणी प्युअर ऍनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या सदस्या सुप्रिया मधुकर दळवी (रा. कोळब, मालवण) यांनी गुरुवारी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार बैलांची अनधिकृत झुंज लावणे, बैलांना क्रूरतेने व अमानुष वागणूक देऊन एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखपतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी १२ प्रमुख संशयितां विरुद्ध भा.द.वि. कलम ४२९, ३४ यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दत्ता दळवी (तळगाव), बाळा पेडणेकर (सुकळवाड), आझीम मुजावर (नेरुर कुडाळ), बाबू ताम्हाणेकर (सुकळवाड), अभि शिरसाट ( कुडाळ), आशिष जळवी (कविलकट्टा कुडाळ), सुनील मांजरेकर (नेरुर), अनिल मांजरेकर (नेरुर), रुपेश पावसकर (कविलगाव कुडाळ), विकी उर्फ सनी केरकर (आसोली वेंगुर्ला), जयगणेश ज्ञानदेव पावसकर (कविलगाव नेरुर) व शुभम नारायण कुंभार (कुडाळ कुंभारवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या झुंजीत रुपेश पावसकर यांच्या मालकीच्या अर्जुन नामक बैलाची विकी उर्फ सनी केरकर यांच्या मालकीच्या बाबू नामक बैलाशी अंतिम झुंज झाली.

यात विकी केरकर यांचा बाबू बैल जखमी होऊन त्याला शिरोडा येथील डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला. गुन्हे दाखल असलेल्या १२ जणांपैकी दत्ता दळवी, बाळा पेडणेकर, आझीम मुजावर, बाबू ताम्हाणेकर, अभि शिरसाट, आशिष जळवी, रुपेश पावसकर, विकी उर्फ सनी केरकर, जयगणेश ज्ञानदेव पावसकर व शुभम नारायण कुंभार या १० जणांना आज अटक करण्यात आली. दुपारी त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करत १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

मात्र, आरोपींकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. यास पोलिसांनी हरकत घेत आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर असून ते पुन्हा अशा स्वरूपाचा गुन्हा करू शकतात, झुंजीत बैलाच्या मृत्यूमुळे जनप्रक्षोभ झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असे न्यायालयास सांगितले. यावर आरोपींतर्फे ऍड. स्वरूप पई यांनी आरोपी हे पळून गेलेले नाहीत, ते स्वतः पोलीस स्थानकात दाखल झाले तसेच त्यांनी कोणावरही दबाव आणलेला नाही असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने सर्व दहा आरोपींची प्रत्येकी ७ हजार ५०० रुपयांच्या जामिनावर सशर्त सुटका केली. संशयित आरोपींनी पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे, पळून जाऊ नये, तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये अशा अटीशर्ती आरोपींना घातल्या गेल्या आहेत. या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page