भाजपची मागणी
मालवण (प्रतिनिधी) तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीत बैलांना अमानुष वागणूक देण्यात आली. तसेच झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला. या झुंजीच्या आयोजकांवर व सहभागी स्पर्धकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, गणेश कुशे, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, संतोष गावकर, आबा हडकर व इतर उपस्थित होते. मालवण तालुक्यातील तळगाव भागामध्ये बेकायदेशीर रित्या बैलझुंज स्पर्धा भरविण्यात आलेली होती. या बैल झुंजी दरम्यान मोठ्या संख्येने जमाव जमविणे, प्राण्यांचे, बैलांचे अमानुष हाल करणे अशा घटना घडलेल्या आहेत यात अमानुष कृत्याचा कळस म्हणजे या झुंजीदरम्यान एका बैलाचा मृत्यु झाल्याचे प्रसार माध्यमांमधुन दिसुन येत आहे. भारतीय जनता पार्टी मालवणच्यावतीने या सर्व घटनेचा निषेद करीत असुन संबंधित आयोजकांवर व सहभागी स्पर्धकांवर कायदेशिर कारवाई व्हावी, प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत अतिजलद कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
