पुत्तूर शहर जागतिक नकाशावर ठसा उमटवेल

कृषी, शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर काजू संशोधन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवी इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन

वेंगुर्ला ता.०१-:* नव्याने जोडलेल्या पायाभूत सुविधा पुत्तूर शहराला जागतिक नकाशावर ठसा उमटविण्यास मदत करतील आणि शेतक-यांना त्यांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी काजू संशोधन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – काजू संशोधन संचालनालयाच्या रौप्य महोत्सवी इमारतीचे उद्घाटन ३१ मार्च रोजी मंत्री नरेंद्र सिह तोमर यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कैलास चौधरी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ.त्रिलोचना महापात्रा, उद्यानविद्यावेत्ता डॉ.ए.के.सिग, कार्यवाह संचालक डॉ.टी.एन.रविप्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना तोमर म्हणाले की, आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असलेला आपला देश कच्चा काजू उत्पादनातही स्वयंपूर्ण झाला पाहिजे, त्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे.

शास्त्रज्ञांनी उच्च घनता लागवड, उच्च उत्पादन देणारे वाण आणि उत्तम लागवड पद्धती यासारखे तंत्रज्ञान देण्यासाठी संशोधन केले पाहिजे. जेणेकरुन आपल्या शेतक-यांना फायदा होईल आणि त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. काजू प्रक्रिया उद्योग हा महिला मजूरांना अधिक रोजगाराच्या संधी देऊन महिला सशक्तीकरणात योगदान देण्यामध्ये उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालनालयाने अधिक संधोधन करुन उच्च वाण विकसित करावे जेणेकरुन शेतक-यांना त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळू शकेल. उच्च घनतेची लागवड लोकप्रिय करण्यासाठी आणि काजू कलमांचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केले. क्षेत्रविस्तारासाठी विस्तृत वाव आहे आणि आपले पंतप्रधानांच्या ‘लॅब टू लँड‘ संकल्पनेअंतर्गत शेतक-यांपर्यंत नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे कैलाश चौधरी यांनी सांगितले.

सन १९८६ पासून काजू संशोधन संचालनालयाने भारतातील काजूच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. केंद्राने अलिकडेच तीन काजूच्या जाती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यापैकी दोन जाती या मोठ्या काजूगराच्या असून एक ठेंगू जात आहे असल्याची माहिती डॉ.त्रिलोचना महापात्रा यांनी दिली. उद्यानविद्यावेत्ता डॉ.ए.के.सिग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यवाह संचालक डॉ.टी.एन.रविप्रसाद यांनी संचालनालयाला रौप्यमहोत्सवी इमारत मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणा-या सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page