सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताखाली घरतोडीबिल्डर लॉबीची कणकवलीत दांडगाई

शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आरोप;पोलिसांची भूमिका संशयास्पद

कणकवली ता.०१-:* कणकवली नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तखाली काही घरतोडीडी बिल्डर लॉबीची कणकवलीत दांडगाई सुरु झाली आहे.कणकवली शहरातल्या काही मोक्‍याच्या जागा ,जमीन, मिळकती आणि बिल्डिंग शोधण्याचे काही नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचे भाऊबंद यांना हे काम सोपविण्यात आलेले आहे. लोकांच्या जमिनी बळकावणे, जमीन मालकांची अडवणूक करणे, काही ठराविक बिल्डर लॉबीशी संगनमत करून कणकवली शहरातील मोक्याच्या जागा गिळंकृत करणे, हडप करणे, जमीन मालक ,रहिवाशी ,भाडेकरू यांना धाकदपटशाही करून, वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्या जमिनी लाटण्यासाठी कणकवलीत सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते ,माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संदेश पारकर बोलत होते. संदेश पारकर म्हणाले,कणकवलीत पटवर्धन चौक येथील नगर भूमापन क्रमांक १३३४ ते १३४१ मधील एक ३ मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. कणकवली शहरातील सत्ताधाऱ्यांनी फसवणुकीचा चौथा प्रकार केला आहे.यापूर्वी सत्ताधारी टोळीने कणकवली बाजारपेठेतील टोनेमारे बिल्डिंग रातोरात बेचिराख केली व भाडोत्री लोकांना उध्वस्त केले . एसटी बस स्टँड समोरील आरोलकर बिल्डिंग जेसीबी लावून रातोरात पाडली गेली. येथील अनेक भाडोत्री उद्धवस्त झाले.जळकेवाडीतील श्रीमती कडुलकर यांचीही बिल्डींग अशीच पाडण्यात आली, ती भगिनी आजही रडते आहे. आताच पटवर्धन चौक येथील मोर्ये बिल्डींगचा प्रकार आहे. बिल्डींग रातोरात गुंडगिरी करत पाडण्यात आली. त्या सर्वांचे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवहार आणि परवानगी बाबत चौकशीची मागणी करणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.

या बिल्डींग बाबत पोलिसांना विजयालक्ष्मी धुमाळे यांच्या तक्रारीतून या ठिकाणी बिल्डिंग तोडण्यासाठी असलेले ३ जेसीबी, आणि २ डंपर यांचे नंबर दिलेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई नाही. मात्र पोलीस उलट फिर्यादीना तुम्ही त्या ठिकाणी भाडेकरू होता का? याचे पुरावे सादर करा अशी नोटीस पाठवतात. पोलिसांचा तपास संशयास्पद असा घणाघाती आरोप संदेश पारकर यांनी केला आहे. पोलीस शहरातील ३ मजली इमारत रातोरात गायब होते. त्यातील सामान चोरून नेले जाते. इमारतीचा मलबा गायब केला जातो याचा शोध मात्र पोलीस घेत नाहीत.

हे सार गौडबंगाल आहे. या सर्व गैर कारभाराकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेही लक्ष वेधणार आहे.त्यानंतर या सत्ताधारी लोकांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे. मोर्ये बिल्डींग बाबत पोलिसांनी योग्य भूमिका बजावावी आणि आरोपींना त्वरित अटक करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.या प्रकरणात तक्रारदाराच्या जीविताला धोका असून त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले आहे.हा प्रकार पहाटे, दिवसाढवळ्या आणि रात्री असा सतत तीन दिवस घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात ही लाजिरवाणी बाब आहे.

न्यायालयाने संशयित आरोपीना येथील वावराला स्थगिती असतानाही आरोपी मिळकतीत अजूनही वावरत आहेत,असे संदेश पारकर म्हणाले. आरोपींवर पोलिसांची कारवाई न होण्यामागे झारीतले शुक्राचार्य कोण यांची नावे योग्य वेळी मी जाहीर करणार आहे.तक्रारीनुसार गुन्हा शनिवार २६ मार्च २२ दाखल आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने आरोपी उघडपणे फिरताहेत.आरोपी तक्रारदारांना धमकावत आहेत. कणकवली पोलीस म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला. कणकवलीतील नागरिकांनी सजग आणि सावध रहावे. कधीही अचानक रात्रीच्या वेळी कोणतेही घर कोसळण्याची, पेटण्याची, जमीनदोस्त होण्याची भीती आहे.जेसीबी घेऊन ठराविक भाई तयारच आहेत.

कणकवली शहराची आध्यत्मिक संत म्हणून परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्य भूमी आणि कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी कर्मभूमी म्हणून ही खरी कणकवलीची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा या नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.या अपप्रवृत्तीचा आम्ही बिमोड करणार आहोतच, शिवाय या प्रवृत्तीला नियती कधीच माफ करणार नाही कारण अनेकांचे संसार यांनी त्या सर्वांचे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यवहार आणि परवानगी बाबत चौकशीची मागणी करणार आहे.अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा माझा स्थायीभाव आहे. या बिल्डींग मधील डॉ अनंत रेवडेकर हे सुसंस्कृत, सेवाभावी डॉक्टर म्हणून अनेक पिढ्याना माहीत आहेत. त्यांनी कणकवली वाशी यांनाच नव्हे तर जिल्हावासीयांना अत्यंत चांगली सेवा दिली होती. खरतर आशा व्यक्तींच्या स्मृती जपण्याच्या सोडून त्यांची ५० वर्षाहून अधिक वर्षाची सेवा आणि त्याच्या आठवणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा टोला संदेश पारकर यांनी लगावला. दलित चळवळीतील नेते एन एस कंदळगावकर यांचे कार्यालय देखील याच इमारतीत होते. त्यांचा लढा आज उध्वस्त केला गेला आहे.कणकवलीच्या सत्ताधाऱ्यांचा हा सत्तेचा उन्माद आपण उध्वस्त करणार आहे.या सर्व प्रकरणात उध्वस्त झालेल्या नागरिकांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी आपण लढा उभारणार आहोत, वेळ पडल्यास कुणाच्याही विरोधात जाण्याची वेळ आली तरीदेखील आपण गप्प बसणार नाही,असा इशारा संदेश पारकर यांनी दिला.

You cannot copy content of this page