सावंतवाडी ता.०१-:* ७ व ८ मे रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी समाजवादी चळवळीतील लढाऊ नेते संजय वेतुरेकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई, सेक्रेटरी अंकुश कदम व कार्याध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रात याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
समाजवादी विचार परंपरेचा झेंडा खांद्यावर घेवून शिक्षण चळवळीत प्रदीर्घ काळ सक्रिय असणारे संजय वेतुरेकर यांनी संयोजन समितीकडून स्वागताध्यक्षपदासाठी देण्यात आलेला प्रस्ताव स्विकारल्याने समितीच्या सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. संजय वेतुरेकर हे जिल्ह्यातील शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच ते राज्य प्रमुख कार्यवाह देखील आहेत. वेतुरेकर यांनी समाजवादी विचारांशी कोणतीही तडजोड न करता जिल्ह्यात शिक्षक भारतीची चळवळ माध्यमिक व प्राथमिक विभागात मजबुतीने उभी केली आहे.
ते कुडाळ तालुक्यातील डिगस माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. छात्रभारतीच्या चळवळीतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणा-या वेतुरेकर यांनी जिल्ह्यातील छात्रभारतीच्या अध्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. १९९५ ते २००० या काळात ते कुडाळ पंचायत समितीचे सदस्यही राहिले आहेत. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिक्षक भारतीचे चळवळ जिल्ह्यात सुरु करण्यात वेतुरेकर यांचा महत्त्वाचा पुढाकार राहिला आहे. शिक्षक भारतीचे काम जिल्ह्यात सुरु केल्यानंतर आपल्या धडाडीच्या नेतृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच प्राथमिक तसेच माध्यमिक विभागात चळवळीची मजबूतूने बांधणी केली. राष्ट्र सेवा दलातही ते सक्रिय आहेत.
जिल्ह्यातील परिवर्तवादी चळवळीत कायम आघाडीचा सैनिक म्हणून सक्रिय असणारे वेतुरेकर यांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्याने संयोजन समितीने त्यांचे आभार मानले आहेत. वेतुरेकर याच्या साथीने सावंतवाडीत दलित आदिवासी,भटकेविमुक्त,कष्टकरी बहुजनांच्या मुक्तीदायी राजकारणाच्या बाजूने सांस्कृतिक हस्तक्षेप म्हणून होत असलेले जनवादी साहित्य संमेलन यशस्वी करु असा विश्वास प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. सावंतवाडीत ७,८ मे रोजी होत असलेल्या या सहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ख्यातनाम लेखिका व पत्रकार संध्या नरे-पवार या आहेत. सिंधुदुर्ग,गोवा आणि दक्षिण कोल्हापूर यांच्या पुढाकारतून हे राज्यव्यापी संमेलन होत आहे.
