प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती;ग्रुप सदस्यांवर सुद्धा करणार कारवाई
ओरोस ता.०१-:मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी येथे २८ मार्च रोजी या झुंजी झाल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेची कारवाई सुरू झाली आहे. तसेच अशाप्रकारे पैज लावून प्राण्यांच्या झुंजी लावत राक्षसी आनंद घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहे. या व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व मेंबरवर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच यापुढे असा प्रकार जिल्ह्यात घडणार नाही, अशी ग्वाही प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असलेल्या बैल झुंज व त्यात मृत झालेल्या ‘बाबू’ बैलाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बैठक सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पुढे बोलताना बगाटे यांनी, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या झुंजीत एका निर्जीव प्राण्याचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील प्राणी प्रेमी व नागरिक यांच्यामुळे हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे या नागरिकांचे आपण आभार मानतो. घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो. कायद्याने बंदी असताना केवळ आपल्या आनंदासाठी ही झुंज आयोजित केल्याची माहिती यावेळी नितीन बगाटे यांनी दिली.
