नागरिकांत भीतीचे वातावरण
कणकवली 31 मार्च (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील भिरवंडे खलांतर खरलवाडी येथे सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खरलवाडी येथे 23 मार्चला अनिल सावंत या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले होते.
त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र, त्या बिबट्याचा वावर अजूनही त्याच परिसरात असल्याचे निष्पन्न झाले आहे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास गांधीनगर मुख्य रस्त्यावर पाणवठाकडे जाण्यासाठी बिबटा जंगलातून बाहेर पडताना काही नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा खरलवाडी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे.
त्या परिसरामध्ये वानरांचा कळप आहे या कळपावर पाळत ठेवण्यासाठी बिबट्या अजूनही त्या परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षापासून हा बिबट्या त्याच परिसरात वावरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे याबाबत वनविभागाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा हा बिबट्या स्थानिकांच्या जीवावर हल्ला करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
