अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यास समर्थ – अमित सामंत
मालवण ता.३०-:* राज्यात शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील बलाबल पाहून आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे याबाबतचे स्वातंत्र्य राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हाला दिलेले आहे. तसेच आघाडीच्या बंधनात असलो तरी स्वतःचा पक्षाचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला असून आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने स्वतंत्ररित्या तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर सन्मानजनक आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास समर्थ आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आघाडीतील मित्रपक्षांसह विरोधी पक्षांना दिला आहे. मालवण येथील चिवला बीच हॉटेल मध्ये मालवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमित सामंत हे बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शहरअध्यक्ष सतीश आचरेकर, माजी उपसभापती नाथ मालोंडकर, आगोस्तीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, सुधीर धुरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सदानंद मालंडकर, अशोक पराडकर, सलीम खान, ऍड. सदफ खटखटे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमित सामंत म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरीही प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच धर्तीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन नवीन लोक प्रवेश करत असून त्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी आहे. ग्रामीण भागातही राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचा आमचा प्रयत्न असून पंचायत समिती संघांपर्यंत आम्ही पोहचत आहोत. येत्या काळात ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे मेळावे देखील घेण्यात येणार आहेत.
तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंतरु दत्ता भरणे यांचे जिल्ह्यात दौरेही आयोजित करण्यात येतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष सदस्य नोंदणी देखील चालू असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त क्रियाशील सदस्यांची नोंदणी झाली आहे. येत्या काळात ग्रामीण भागातून काही ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा देखील यावेळी अमित सामंत यांनी केला. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणूका देखील महाविकास आघाडीकडून लढवाव्यात अशा सूचना पक्षाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही आमच्या पक्ष श्रेष्ठींनी दिले आहे. आघाडीची बंधने व जबाबदारी याची कल्पना आम्हाला आहे. तसेच कोणा विरुद्ध लढायचे हे देखील आम्हाला माहीत आहे. आघाडी करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादीसह आघाडीतील मित्र पक्षांचीही आहे. यादृष्टीने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आमच्या नेहमी संपर्कात असून विश्वासात घेत आहेत.
मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने आमदारांना काही चुकीचे सांगितल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. येत्या मालवण नगरपालिका निवडणुकीसह इतर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सन्मानजनक जागा वाटप झाले तर ठीक आहे. मात्र आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते जागावाटप मान्य नसेल तर स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी काँग्रेस समर्थ आहे, असेही यावेळी अमित सामंत म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास निधी येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे.
मात्र विकासकामांना येणारा निधी हा शासकीय असून त्यावर कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. तिन्ही पक्षांनी मिळून चालविलेल्या शासनाच्या माध्यमातून आलेला हा निधी आहे. त्यामुळे त्याचे श्रेय तिन्ही पक्षांना समान मिळाले पाहिजे, असेही सामंत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची नाळ ही तळागाळातील लोकांपर्यंत जोडलेली आहे. राष्ट्रवादीतील काही मंडळी स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असतील तर अशा प्रवृत्तीला आपण निश्चितच आळा घालणार आहोत. राष्ट्रवादीच्या तिकिटावर जे निवडून येतील ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत याची खबरदारी आपण घेऊ. तसेच ते दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांचे राजकारण संपेल याचीही जबाबदारी आपण घेऊ असा सूचक इशाराही यावेळी अमित सामंत यांनी दिला.
