दिवसभर सुरू आहे लपंडाव
सिंधुदुर्गनगरी ता ३० शासनाच्या “एफ एम एस” प्रणालीनुसार ३१ मार्च रात्री बारा वाजेपर्यंत निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत निधी खर्चाची धावपळ सुरू झाली आहे.निधी खर्चासाठी एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्व खातेप्रमुख आपल्याकडील निधी खर्चाची गणिते जुळवण्यात व्यस्त झाले आहेत. मात्र प्रणालीतील व्यत्यय आणि विजेच्या लपंडावामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.
जिल्हा परिषदेचा १९ कोटीचा स्वनिधी व जिल्हा नियोजन मधून विकास कामांना मिळालेला ७६ कोटी निधी असा मिळून एकूण ९२ कोटी निधी खर्चासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. शासनाने निधी खर्चासाठी एफ एम् एस ही संगणक प्रणाली सुरू करून ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत निधी खर्च करण्याची वेळ निश्चित करून दिली आहे .त्यामुळे निधी शंभर टक्के खर्च होण्यासाठी सर्व खातेप्रमुख ,अधिकारी निधी खर्चाची गणिते जुळवण्यात व्यस्त झाले आहेत. जिल्हा नियोजन कडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या ७३ कोटी निधी खर्चाची मुदत ३१ मार्च पर्यंत असल्याने अखर्चित राहणारा निधी शासनाला परत करावा लागणार आहे.
आतापर्यंत या निधीतील ७० टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही ३० टक्के निधी एक दिवसात खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे. मात्र वारंवार सुरू असलेला विजेचा लपंडाव आणि नेट कनेक्टिव्हिटीतील व्यत्यय यामुळे कामकाजात अडचणी येत आहेत. तर निधी खर्चाच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेला निधी आणि प्राप्त झालेली विकास कामाची बिले पाहता सुमारे ३ कोटीहून अधिक निधी अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अखर्चित राहणारा निधी खर्च कसा होणार आणि कुठे खर्च करायचा हे गणित सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत.
