“ती” बोट आमच्या मागणीनुसार आ. नाईक यांच्या पुढाकाराने शासनाने दिली…

विरोधकांनी माहिती घेऊन करावी टीका; किल्ला रहिवासी संघाचे अध्यक्ष मंगेश सावंत आणि श्रीराम सपकाळ यांचा टोला

मालवण (प्रतिनिधी) वादळ परिस्थिती व अतिवृष्टी अशा आपतकाळात सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशांसाठी शासनाकडून सुसज्ज अशी बोट देण्यात आली असून देण्यात आलेली बोट ही आम्ही मागणी केल्याप्रमाणेच आम नाईक यांच्या पुढाकाराने शासनाने दिली आहे आमच्या दहा पिढ्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्या असून किल्ल्या लगतच्या खडकाळ समुद्रात कोणती बोट चालू शकते हे आम्हीच सांगू शकतो त्यामुळे टीकाकारांनी पूर्ण माहिती घेऊन प्रतिक्रिया द्यावी,असा टोला सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशी संघाचे अध्यक्ष मंगेश सावंत व रहिवासी श्रीराम सपकाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीकाकारांना प्रत्युत्तर देताना लगावला आहे.

तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवाशांच्या बोटी वाहून गेल्या होत्या. त्यावेळेस आमदार वैभवजी नाईक यांनी स्वतः त्या परिस्थितीत सिंधुदुग किल्ल्यावर येऊन किल्ल्यातील रहिवाशांची विचारपूस केली होती. सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवाशांना आपत काळात येण्या- जाण्यासाठी एका बोटीची व्यवस्था व्हावी अशी मागणी आमदार नाईक यांच्याकडे रहिवाशांनी केली होती. त्या नुसार आम्हाला आम. नाईक यांनी बोट देण्याचे आश्वासन दिले होते. शासनाकडे पाठपुरावा करत हे आश्वासन आम. नाईक पूर्ण करत बोट उलबद्ध केली.

याबद्दल आम्ही स्थानिक किल्ला रहिवाशी आमदारांचे आणि प्रशासनाचे आभारी आहोत. किल्ला रहिवाशांना विविध प्रश्नात आजपर्यंत अनेक जणांनी आश्वासने दिली. मात्र आमदार वैभव नाईक यांनी किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीचे काम, किल्ल्यात पाण्यासाठी पाईप लाईन, वीज पुरवठा याकामी निधी उपलब्ध करून कार्यवाही सुरू केली आहे, असे मंगेश सावंत व श्रीराम सपकाळ यांनी म्हटले आहे. आपत काळात वापरासाठी बोट मिळावी ही किल्ल्यातील स्थानिक रहिवाशांची मागणी होती. तेथे वायरी ग्रामपंचायतीची मागणी नव्हती.

परंतु शासनाच्या मार्फत देण्यात आलेली बोट सरपंच या नात्याने त्यांच्याकडे शासनाने सुपूर्द केली व ती रहिवाशांकडे देण्यात आली. शासनाने आम्हास मोठ्या बोटीची ऑफर दिलेली होती. परंतु सिंधुदुर्ग किल्ल्यात संपूर्ण खडकाळ भाग असून त्या ठिकाणी पावसाळ्याच्या वेळेस किंवा आपत्कालीन वेळेस अशा मोठ्या बोटी हाताळणं शक्य नाही. त्यामुळे आम्हा रहिवाशांना हवी त्याच पद्धतीत शासनाने ही नौका दिलेली आहे. त्यामुळे मोठी बोट दिली का नाही यावरून टीका करणाऱ्यांनी अशा परिस्थितीत आधी आपले पाय पाण्यात बुडवावे आणि मगच टीका करावी आणि त्यांच्या संकल्पनेतली बोट नक्कीच ग्रामपंचायतीला यापेक्षाही मोठी उपलब्ध करून द्यावी सिंधुदुर्ग किल्ला कायमस्वरूपी पाण्यात आहे. आमच्या दहा पिढ्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलेल्या आहेत. त्यामुळे तिथे कोणत्या प्रकारची बोट चालू शकते हे रहिवाशी सांगू शकतात. टीकाकारांनी पूर्ण माहिती घेऊन प्रतिक्रिया द्यावी, असे प्रत्युत्तर मंगेश सावंत व श्रीराम सपकाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

You cannot copy content of this page