जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रकार
सिंधुदुर्गनगरी ता २९ ऐन मार्च एडींगच्या धावपळीत जिल्हा परिषद बांधकाम विभागात सर्प शिरल्याने बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अखेर सर्पमित्र ओमकार लाड यांच्या मदतीने सर्प पकडण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मार्च अखेर असल्याने जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक ठेकेदार यांची वर्दळ असते. त्यात कर्मचारी आपापली कामे पूर्ण करण्यात व्यस्त असतानाच आज सकाळी नेहमी प्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी सुहास हरमलकर आणि रमेश सावंत हे सकाळी ११ वाजता बांधकाम विभागातील लाईट साहित्य असलेल्या कपाटातील साहित्य घेण्यासाठी कपात उघडले असता कपाटात सर्प असल्याचे आढळून आले. विभागात सर्प असल्याने येथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विभागातील कर्मचारी मिळेल त्या वाटेने विभागच्या बाहेर पळू लागले होते. बघता बघता ही माहिती पूर्ण जिल्हा परिषद आवारात पसरली. त्यामुळे बांधकाम विभागाच्या बाहेर बघ्यांची गर्दी झाली होती. अखेर या विभागातील सर्प पकडण्यासाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमचे सहसचिव ओमकार लाड (वराड) यांना बोलवण्यात.
ओमकार लाड यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात येत मोठ्या शिताफीने सर्प पकडला. या सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले. दरम्यान बांधकाम विभागात दाखल झालेला सर्प पकडला गेल्याने या विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
