ही तर चोराची उलटी बोंब

नागेंद्र परब यांचा रणजित देसाई यांच्यावर पलटवार

सिंधुदुर्गनगरी ता २९ जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नासह हस्तांतरित व अभिकरण योजनांसाठी प्राप्त झालेला कोट्यावधीचा विकासनिधी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आपल्या कार्यकालात खर्च करू शकले नाहीत. अशा निष्क्रिय ठरलेल्यानी पालकमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे “चोरांच्या उलट्या बोंबा” असल्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.

सत्ताधारी भाजप पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेतून पालकमंत्री उदय सामंत यांचे मंत्रालयात वजन राहिले नाही. त्यामुळे दायित्वाची रक्कम जिल्हा नियोजन च्या बजेटमधून द्यावी लागली अशी टीका केली होती. याबाबत आज शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. यावेळी नागेंद्र परब म्हणाले सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे जिल्हा परिषदेला ४६ कोटीचा अखर्चित निधी शासनाला परत करावा लागला होता. आपल्या अपयशाचे खापर आता दुसऱ्यावर फोडत आहेत.

पालक मंत्री उदय सामंत यांचे वजन रहिले नाही असे म्हणणाऱ्या रणजित देसाई यांनी ते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत .त्यांनी एवढी वर्ष सत्ता भोगून स्वतासाठी उद्योग उभारले. त्याचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा झाला. त्याचा अभ्यास करावा त्यानंतरच शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करावी. शिवसेना महाविकास आघाडी सरकारकडून सागरी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, यासह विविध विकास कामे केली. जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले, त्यासाठी ९०० कोटी ची तरतूद केली. आता हे महाविद्यालय सुरू होत आहे .शिवाय जिल्ह्यातील रस्ते व पुलांसाठी ७५ कोटी निधीची तरतूद केली आहे. असे असताना जिल्हा परिषदेत सत्ता भोगणार्‍या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांचे वजन नाही अशी टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार असल्याची टीका यावेळी नागेंद्र परब यांनी केली.

तर जिल्हा परिषदेसाठी २०२०-२१ मध्ये प्राप्त झालेला निधी केवळ ६७ टक्के एवढाच खर्च झाला उर्वरित निधी शासनाला परत करण्याची नामुष्की ओढवली गेली याला पदाधिकारिच जबाबदार आहेत. जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील निधीही शंभर टक्के खर्च करू शकले नाहीत. हस्तांतरित योजनेसाठी गेल्या दोन वर्षात १०६ कोटी रुपये मिळाले त्यापैकी सुमारे ३७ कोटी एवढाच निधी खर्च झाला. केवळ ३६ टक्के निधीच खर्च करू शकले. अभिकरण योजनेसाठी २०२०-२१आणि २०२१-२२ या दोन वर्षासाठी ६ कोटी ५९ लाख एवढा निधी प्राप्त झाला त्यापैकी केवळ १५ लाख एवढा सुमारे 23 टक्के निधी खर्च करण्यात आला .

उर्वरित निधी अद्याप अखर्चित आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालात सर्व योजनांचा मिळून ५० टक्केही निधी खर्च करता आला नाही. ही पदाधिकाऱ्यांची नामुष्की आहे. आता हा निधी शंभर टक्के खर्च करण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्हा परिषदेचा अद्यापही मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला आहे आणि तो परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे रणजित देसाई यांनी यापुढे आमच्या नेत्यांवर टीका केली तर आम्हालाही पातळी सोडून बोलावे लागेल असा इशारा नागेंद्र परब यांनी यावेळी दिला. दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होतील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. तर येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे प्रकल्प दोन वर्षात निश्चितच पूर्ण होतील आणि जिल्ह्याचा पर्यटनाचा आदित्योदय होईल असा आशावाद यावेळी नागेंद्र परब यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page