मालवण ता.१९-:* हिंदुत्वाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाबाबत जनजागृती करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेकडून ३ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत बलिदान मास पाळला जात आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदान मासचे महत्व समस्त शिवप्रेमी आणि हिंदूंना समजावे, यासाठी येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिराबाहेर सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत आणि शिवप्रेमींच्या वतीने शुक्रवारी जनजागृती फलक लावण्यात आला.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या या कालखंडात छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब याने पकडून हाल हाल करून मारले. संभाजी महाराज यांनी औरंगजेबाने दिलेले धर्म परिवर्तनाचे आमिष धुडकावून धर्म रक्षणासाठी मृत्यू स्वीकारला. त्या बलिदानाचे उपकार समस्त हिंदु समाजावर आहेत. त्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या माध्यमातून यावर्षी कुडाळ शहरात जिजामाता चौक येथे ३ मार्च ते १ एप्रिल २०२२ या कालावधीत बलिदान मास पाळण्यात येत आहे.
त्यामुळे धर्मवीर बलिदान मासची जागरूकता वाढावी तसेच आपला देव, देश आणि आपली मंदिरे ही धर्मवीर श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेल्या त्यागामुळे आहेत. हे सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कळावे, म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी स्वखर्चाने शुक्रवारी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरा समोर या बालिदान मासचा जनजागृतीचा फलक लावला. यावेळी शिवप्रेमी हार्दिक शिगले, शांती तोंडवळकर, कल्पिता जोशी, सौ. प्रतीक्षा कोरगावकर, साक्षी मयेकर, दिव्या मंडलिक, स्नेहा धुरी, दिया पवार, अश्विनी आचरेकर आदी उपस्थित होते.
