मालवण ता.१८-:* मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिराच्या अवघड वळणाच्या उताराच्या रस्त्यावर मोटारसायकल व टाटा सुमो गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी घडली.
जखमी तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिराकडील उताराचा रस्ता हा अवघड वळणाचा आहे. याच वळणाच्या रस्त्यावर आज सायंकाळी मालवणहुन कुंभारमाठच्या दिशेने होंडा शाईन मोटरसायकलने जाणारा तरुण आणि मालवणच्या दिशेने येणारी टाटा सुमो गाडी यांच्यात समोरासमोर धडक बसली. या धडकेत मोटरसायकलस्वार तरुण रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून त्या तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या अपघाताची कोणतीही नोंद मालवण पोलीस स्थानकात सायंकाळी उशिरापर्यंत दाखल नव्हती.
